पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे

0
242

पुणे, दि. १५ (पीसीबी) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदरच्या प्रा. दिगंबर दुर्गाडे यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांना संधी देण्यात आली आहे. आज सकाळी जिल्हा बॅंकेच्या मुख्य शाखेत सर्व नवनिर्वाचित संचालकांना आमंत्रित करण्यात आले होते. याच वेळी ही निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि जिल्हा बँकेचे संचालक अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चर्चा करुन प्रा. दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे यांची नावं अंतिम केली.

दिगंबर दुर्गाडे यांनी ‘ड’ वर्ग अन्य सहकारी संस्थांच्या मतदारसंघातून शिरूर आणि हवेलीचे भाजप तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांना पराभूत केले आहे. फराटे यांना अनुभवी दुर्गाडे यांच्याकडून तब्बल ६८४ मतांनी पराभव स्विकारावा लागला आहे. तर चांदोरे यांनी मुळशी तालुका मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत विजय मिळवला आहे.

सुरुवातीला अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे शिलेदार रमेशआप्पा थोरात यांना पुन्हा संधी देण्यात येईल असे अंदाज बांधले जात होते. मात्र प्रा. दिगंबर दुर्गाडे यांचे नाव आज उजवे ठरले. याशिवाय बॅंकेच्या निवडणुकीत तब्बल ८५ टक्के मताधिक्याने विजयी झालेले अशोक पवार , जुन्नरमधून प्रत्येक आमदारकीवेळी तडजोड म्हणून बॅंकेत राहणाऱ्या संजय काळे , आमदार दिलीप मोहिते आणि वेल्ह्यातून रेवणनाथ दारवटकर यांची ही नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होती.

पुणे जिल्हा बॅंकेच्या २०२१-२०२६ या पाच वर्षाच्या कार्यकाळासाठीच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी २ जानेवारी २०२२ रोजी निवडणूक झाली होती. ४ जानेवारीला मतमोजणी होऊन, निकाल जाहीर करण्यात आले. संचालक मंडळाच्या २१ पैकी १६ जागा जिंकत, सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा बॅंकेवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. याशिवाय राष्ट्रवादी कॉंगेसचेच असलेले विकास दांगट अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. ते केवळ कागदोपत्री अपक्ष आहेत.