पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून पावणेतीन लाखांचा गंडा

0
519

पुणे, दि. २१ (पीसीबी) – एका पुजाऱ्याच्या मुलाला आणि सुनेला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला लावतो असे सांगून त्यांची तब्बल २ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी फसवणुक झालेल्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मामलेदार कचेरीत डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेला श्रीकांत पवार नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या वडगाव बुद्रुक येथे राहतात. तिचे सासरे आणि पती दोघेही पुजापाठ करून उदरनिर्वाह करतात. जून २०१८ मध्ये त्यांची ओळख आरोपी श्रीकांत पवार याच्याशी झाली होती. तुमचे पुजा पाठ करून भागते का असा भावनिक प्रश्न विचारत तुमच्या सुनेला आणि मुलाला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो असे सांगितले. तो मामलेदार कचेरीत डाटा एन्ट्री ऑपरेटर आहे असे त्यांना माहित झाले. त्यानंतर त्यांचा विश्वास बसला. त्यांनी नातेवाईक आणि पतसंस्थेकडून कर्ज काढून त्याला २ लाख ७० हजार रुपये दिले. त्यानंतर त्याने महिलेला निवडणूक शाखेत शिक्के मारणे, किरकोळ अर्ज टाईप करणे अशी कामे करण्यास दिली. एका महिन्यात महिलेची इतरांशी ओळख झाली. तेव्हा पगाराचे काम पाहणाऱ्या व्यक्तीला तिने विचारले. त्यांनी पैसे देऊन नोकरी लागत नाही असे सांगितले. त्यानंतर महिलेने उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या केबीनमध्ये जाऊन पगाराबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी तिला पैसे देऊन नोकरी लागत नाही. तुम्ही पोलिसात जा असे सांगितले. त्यानुसार महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. एस. काळे तपास करत आहेत.