Pune

पुणे आरटीओ कार्यालयाला लागलेल्या आगीत वाहन नोंदणीची कागदपत्रे जळून खाक

By PCB Author

June 13, 2018

पुणे, दि. १३ (पीसीबी) – पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पहिल्या मजल्यावरील एका खोलीला लागलेल्या आगीत वाहन नोंदणीची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. ही आग आज (बुधवार) सकाळी साडेआठच्या सुमारास लागली. अग्निशामक दलाला आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत अवघ्या पंधरा मिनटांमध्ये आग आटोक्यात आणण्यात आली.

अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीला सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. या खोलीत वाहनांच्या नोंदणीचे कागदपत्रे ठेवण्यात आले होते. या कागदपत्रांना आग लागल्याने मोठ्याप्रमाणात धूर खोलीतून येत होता. आगीची माहिती मिळताच  अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पाण्याचा मारा करत अवघ्या पंधरा मिनिटात आग नियंत्रणात आणण्यात आली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, वाहनांच्या नोंदणीचे कागतपत्रे या आगीत जळाले असले तरी त्याची नोंदणी संगणकावर केली असल्याने वाहनांच्या माहितीचे कुठलेही नुकसान झाले नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली.