‘पुणे आणि औरंगाबादचं नामांतर व्हावं का?’, अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले…

0
250

मुंबई, दि.०७ (पीसीबी) : राज्यात सध्या सगळीकडे औरंबादच्या नामांतराचा विषय चर्चेत आहे. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं अशी मागणी होत असताना काँग्रेसने मात्र यासाठी विरोध दर्शवला आहे. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करत आहे. मात्र हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नसल्याची आठवण काँग्रेस करुन देत आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून शिवसेना आणि काँग्रेस नाटक कंपनी असल्याची विनोदी टीका केली जात आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेसाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला स्पष्टपणे विरोध असल्याचं म्हटलं आहे. आता अजित पवारांनी नामांतरावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित पवार म्हणाले कि,“महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे आलं. गेल्या एक वर्षापासून यावर काम सुरु आहे. या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करु आणि मार्ग काढू,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.एवढच नाही तर पुण्याचं नाव बदलण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केल्यासंबंधी त्यांना विचारण्यात आलं असता अजितदादा पवार म्हणाले की, “कोणी काय मागणी करावं हा ज्याच्या त्याचा आधिकार आहे. कोणी भावनिक मुद्दे काढतं, कोणी विकासाबद्दल बोलतं, कोणी नामकरणाबद्दल बोलतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या इतिहासात घडल्या आहेत. अशा काळात एका शहराचा मुद्दा आला तर दुसऱ्या शहरांचाही उल्लेख होते. आपल्या वक्तव्याच्या बातम्या झाल्या की मग इतरांनाही सुचू लागतं. मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. हे आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडी टीकावी आणि विकासाला महत्व द्यावं ही शरद पवारांची भूमिका असून आम्हीदेखील त्याचं समर्थन करुन पुढे जात आहोत”.