पुढील वर्षी मार्चमध्ये पहिली मानांकन स्पर्धा

0
405

पुणे दि.२३ (पीसीबी) : युनायटेड जागतिक कुस्ती महासंघानेकोरोनाच्या संकटाचा आढावा घेत आपल्या नव्या स्पर्धात्मक कार्यक्रमात बदल केला आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचा मोसम आता पुढील वर्षी मार्चपासून सुरू होईल. जागतिक महासंघाने प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात हा बदल नमूद करण्यात आला आहे. करोनाच्या संकटामुळे जागतिक कुस्ती महासंघाने यापूर्वीच आपली जागतिक अजिंक्यपद स्पर्धा रद्द केली होती. अर्थात, खेळ सुरू करण्याची मान्यता मिळाल्यानंतर तयारीला सुरवात करणाऱ्या मल्लांसाठी त्यांनी वैयक्तिक विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन केले होते. सर्बियात बेलग्रेड येथे ही स्पर्धा पार पडली. करोनाचे संकट असूनही आरोग्य महासंघाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांना स्वतःच्या सूचनांची जोड देत जागतिक महासंघाने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. या स्पर्धेच्या आयोजनाने समस्यांचा अंदाज आलेल्या जागितक महासंघाने करोना सदृश्य परिस्थितीचा अभ्यास करत आपल्या कार्यक्रमात थोडाफार बदल केला.

असा आहे कार्यक्रम
जागतिक महासंघाच्या नव्या कार्यक्रमानुसार आता मोसमातील पहिली मानांकन स्पर्धा इटलीत ४ ते ७ मार्च दरम्यान पार पडेल. त्यानंतर ऑलिंपिक पात्रतेसाठी आशियातील फेरी ९ ते ११ एप्रिल दरम्यान कझाकस्तान येथे होईल. ही स्पर्धा संपली की लगेच दुसऱ्या दिसापासून म्हणजे १२ एप्रिलपासून तेथेच वरिष्ठ गटाची आशियाई अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात येईल. ऑलिंपिक पात्रतेची जागतिक फेरी ६ ते ९ मे दरम्यान बल्गेरिया येथे होईल.