Maharashtra

पुढच्या वर्षी ‘वर्षा’वर आपणच बाप्पाची प्रतिष्ठापना करणार – मुख्यमंत्री

By PCB Author

September 02, 2019

मुंबई, दि. २ (पीसीबी) – राज्यावरील पुराचे संकट दूर करो, पीडितांना दिलासा मिळण्यासाठी बाप्पाचरणी प्रार्थना केली. शिवाय, पुढच्या वर्षीसुद्धा शासकीय निवासस्थानी आपणच बाप्पाची प्रतिष्ठापना करणार,  असा विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सहपरिवार गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी पत्नी अमृता फडणवीस, मुलगी आणि कुटुंबियांसोबत मुख्यमंत्र्यांनी बाप्पाची आरती केली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजनदेखील सहकुटुंब उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गणेश पर्व अत्यंत आनंदाचे पर्व आहे. देशात -विदेशात हा सण साजरा होतो. मात्रा मराठी माणूस जिथे असतो तिथे या सणाचा उत्साह वेगळाच असतो.  गणरायाला एवढीच प्रार्थना की सर्वांना आशीर्वाद द्यावा. महाराष्ट्रावरील संकट दूर करण्यासाठी आणि पूर पीडितांना दिलासा मिळावा यासाठी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

बाप्पांचा आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी राहिला आहे त्यामुळे स्वतःसाठी काही मागण्याची वेळच आली नाही, असे फडणवीस म्हणाले.  पुढच्या वर्षी वर्षावर आपणच गणपती बसवणार का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी ‘कोई शक है क्या?’ अशा शब्दात उत्तर दिले.