पुढचे चार दिवस पुन्हा गडगडाट

0
233

मुंबई, दि १९ (पीसीबी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं हाहाकार माजला आहे. अशात आजही राज्यावर अस्मानी संकट असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुण्यासह राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकणात वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आज रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील वेगळ्या ठिकाणी तुरळक गडगडाटीसह मुसळधार पाऊस होईल. मंगळवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील वेगळ्या ठिकाणी तुरळक गडगडाटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बुधवारीदेखील या भागांत धुवांधार पाऊस होईल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

दरम्यान, अंदमानच्या समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत धुवाधार पाऊस पडला. हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या अरबी समुद्रात आहे. तिथे त्याची तीव्रता कमी होत असून, पुढील 24 तासांमध्ये या क्षेत्राचा प्रभाव संपेल. पाठोपाठ बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांमध्ये निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

आज सोमवारपासून या क्षेत्राची तीव्रता वाढणार असून त्यानंतर ते वायव्य दिशेला पूर्व किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यात आजपासून गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मंगळवारी (ता. 20) हा अलर्ट पुण्या-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिला आहे.

राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सोमवारी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या सूत्रांनी वर्तविला.

यादरम्यान 24 तासांमध्ये 15.6 ते 64.4 मिलिमीटर पाऊस पडेल, असxही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दरम्यान, हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस होण्याची अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे 21,22 आणि 23 ऑक्टोबरला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. परिणामी ग्रामीण भागांतील नागरिकांसह शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.