पुढचे काही महिने आणखी धोक्याचे; WHO चा इशारा

0
228

मुंबई,दि.२४(पीसीबी) – गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जगभरात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही परिस्थितीला गांभीर्याने घेतलं जाताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. काही देशांमध्ये निष्काळजीपणामुळे कोरोनाची भयानक परिस्थितीत निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी भयानक होण्याची शक्यता आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडहॉलम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण जगाला कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जास्त सतर्क राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला. कोरोना संकटामुळे संपूर्ण जग, विशेषत: उत्तर गोलार्ध गंभीर टप्प्यावर येऊन ठेपला आहे. अनेक देशात कोरोना प्रचंड फोफावत आहे. त्यामुळे पुढचे काही महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं टेड्रोस म्हणाले आहेत.

टेड्रोस एडहॉलम यांनी जगभरातील सर्व देशाच्या नेत्यांना कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. कारण आता पुन्हा शाळा, महाविद्यालये, कंपन्या बंद होऊ नये आणि कोरोनामुळे आणखी जास्त लोकांचा बळी जाऊ नये, यासाठी टेड्रोस यांनी योग्य कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात जे सांगितलं होतं तेच पुन्हा सांगण्याची वेळ आली आहे, असं म्हणत टेड्रोस यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान अनेक देशांमध्ये अद्यापही कोरोना संक्रमनाचे नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण हे मोठं आहे. काही देशांमध्ये ऑक्टोबर महिन्यात तर रुग्णालयांच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण आहेत. ही परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे काही महिने जास्त चिंताजनक आहे”, असं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.