“पीसीबी टुडे”ने दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले; शिवाजीराव आढळराव पाटलांचा झाला पराभव

0
713

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सलग तीनवेळा निवडून आलेले खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा यंदा पराभव झाल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला जोरदार राजकीय धक्का बसला आहे. निवडणूक प्रचाराला सुरूवात होण्यापूर्वी आढळराव पाटील यांच्यासाठी सुरक्षित समजला जाणाऱ्या शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीने डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय चित्र बदलले. तसेच १५ वर्षे खासदार असूनही आढळराव पाटील यांना मतदारसंघात ठोस कामे करता न आल्यामुळे सुद्धा मतदारांमध्ये त्यांच्याविषयी मोठी नाराजी होती. त्याबाबत “पिंपरी चिंचवड बुलेटिन” अर्थात “पीसीबी” ने निवडणूक काळात सडेतोड राजकीय विश्लेषण वाचकांसमोर मांडले. शिवाजीराव आढळराव पाटील यांची सीट यंदा धोक्यात असल्याची बातमी “पीसीबी टुडे”ने दिली होती. ती आढळराव पाटील यांच्या पराभवामुळे तंतोतंत खरी ठरली.

पिंपरी-चिंचवड, पुणे तसेच राज्य व देश-विदेशातील बातम्या वाचकांपर्यंत क्षणार्धात पोहोचवणारे “पीसीबी टुडे” या मराठी बातम्यांच्या वृत्तसंकेतस्थळाला लाखो वाचकांनी प्रथम पसंती दिलेली आहे. “पीसीबी टुडे”ने लोकसभा निवडणूक काळात सर्व राजकीय पक्षांच्या हालचाली, त्यांच्या भूमिका आणि निवडणुकीतील उमेदवारांचा प्रचार तसेच मतदारांची कोणाला पसंती मिळत आहे, याबाबत सडेतोड लेखन केले. पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील इत्थंभूत माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम “पीसीबी टुडे”ने केले. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला झुकते माप न देता या दोन्ही मतदारसंघाच्या प्रचार काळातील राजकीय विश्लेषण निर्भिडपणे करताना योग्य तीच माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यात आली.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात. या दोन्ही बालेकिल्ले काबिज करण्यासाठी राष्ट्रवादीने तगडे उमेदवार मैदानात उतरवले होते. मावळ मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार, तर शिरूर मतदारसंघातून पूर्वाश्रमीचे शिवसैनिक तसेच संभाजी मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यामुळे मावळ आणि शिरूर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आणि शिवसेनेसाठी एकतर्फी वाटणारा विजय अवघड बनला. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील चौथ्यांदा विजयी होण्यासाठी मैदानात उतरले होते. डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर होईपर्यंत आढळराव पाटील यांचा विजय “फिक्स” मानला जात होता.

आढळराव पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नव्हता, हे वास्तव “पीसीबी टुडे” ने वेळोवेळी वाचकांपर्यंत पोहोचवले. परंतु, राष्ट्रवादीने पूर्वाश्रमीचे शिवसैनिक डॉ. अमोल कोल्हे यांना उमदेवारी दिल्यानंतर शिरूर मतदारसंघातील राजकीय चित्र पालटले. कोल्हे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आढळराव पाटील यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना कोल्हे यांच्या जातीचा उल्लेख केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. तेव्हापासून आढळराव पाटील यांच्याविषयी मतदारांमध्ये नकारात्मकतेला सुरूवात झाली. त्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराला संपूर्ण मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. आढळराव पाटील यांनी मतदार “मोदी” या नावाने आपणाला नक्की निवडून देतील अशी आशा बाळगून निवडणूक प्रचार काळात कार्यकर्त्यांना आर्थिक बळ देण्याचे जाणूनबूजून टाळले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते ढिले पडले.

त्यातच १५ वर्षे खासदार असूनही शिवाजीराव आढळराव पाटील यांना केंद्र सरकाशी निगडीत विविध विकासकामे पूर्ण करता आली नाहीत. १५ वर्षात त्यांना पुणे-नाशिक महामार्गाचे रूंदीकरण करून मतदारसंघातील नागरिकांची वाहतूककोंडीतून मुक्तता करता आली नाही. विमानतळ मतदारसंघाबाहेर हलवले गेल्यामुळेही मतदार आढळराव पाटील यांना धडा शिकवण्याच्या मनस्थितीत होते. मतदारसंघातील काही गावांनी पाण्यासाठी मतदानांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. या सर्वांचा परिणाम म्हणजे शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची सीट यंदा धोक्यात आली होती. त्याबाबत “पीसीबी टुडे”ने वाचकांना खरी बातमी देण्याचे काम केले. निवडणुकीच्या निकालात आढळराव पाटील यांचा पराभव आणि डॉ. अमोल कोल्हे यांचा विजय झाल्याने “पीसीबी टुडे”ने दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.