“पीसीबी”च्या वृत्ताने भोसरीचे माजी आमदार विलास लांडे जागे झाले; सत्ताधारी भाजपवर केला प्रहार

0
663

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद आणि दोनवेळा आमदारकी उपभोगणारे तसेच आमदार झाल्यानंतर राजकीय खेळ्या करून महापालिकेची सर्व महत्त्वाची पदे आपल्याच घरात खेचून आणणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी विरोधात बसण्याची वेळ आल्यानंतर सत्ताधाऱ्यांबाबत मिठाची गुळणी धरल्याचे वृत्त पीसीबीने नुकतेच प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर अवघ्या काही दिवसांतच विलास लांडे खडबडून जागे झाले आहेत. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीने शुक्रवारी (दि. १३) पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये विलास लांडे यांनी शास्तीकर माफी आणि प्रधानमंत्री आवास योजनेवरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर प्रहार केले. त्यामुळे “पीसीबी”ने वृत्त दिले आणि लांडे जागे झाले, अशीच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.  

विलास लांडे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे दोनवेळा आमदार होते. एकदा राष्ट्रवादी, तर दुसऱ्यांदा अपक्ष आमदार म्हणून त्यांनी लोकप्रतिनिधीत्व केले. आमदार होण्यापूर्वी त्यांनी शहराचे महापौरपदही भूषविले आहे. आमदार झाल्यानंतर आपल्या पत्नीला महापौरपद आणि जवळचे नातेवाईक अजित गव्हाणे यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी मिळवून दिले. त्यामुळे महापालिकेची सर्व सत्तासूत्रे विलास लांडे यांच्या घरातच होती. आता त्यांच्यावर विरोधात बसण्याची वेळ आली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत लांडे यांचा पराभव झाला. त्यानंतर महापालिकेतही सत्ताबदल होऊन भाजपने राष्ट्रवादीची सत्ता हस्तगत केली. त्यामुळे लांडे यांच्यावरही विरोधात बसण्याची वेळ आली.

दोनवेळा आमदार आणि घरच्यांच्या माध्यमातून महापालिकेतील सर्व महत्त्वाची पदे हाताळणारे लांडे यांना महापालिकेचा कारभार कसा चालतो, अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून कोणकोणत्या चुका होतात, याची इत्थंभूत माहिती आहे. तरीही विलास लांडे यांनी गेल्या दीड वर्षापासून महापालिकेतील कारभाराबाबत ळमिळी गुपचिळी धरली आहे. त्याबाबत पीसीबीने काही दिवसांपूर्वीच वृत्त दिले होते. त्याची दखल घेऊन माजी आमदार विलास लांडे यांनी अखेर मौन सोडले आहे. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना लांडे यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केले. शास्तीकर माफी आणि प्रधानमंत्री आवास योजनेवरून त्यांनी सत्ताधाऱ्यावर गंभीर आरोप केले.

शास्तीकर माफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारकडून शहरवासीयांचा तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे लांडे यांनी सांगितले. या निर्णयाचा अध्यादेश अद्याप आलेला नाही. राष्ट्रवादीने केलेल्या कामांवरच भाजपचा कारभार सुरू आहे. भाजपने एकही विकासाचे काम केले नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मोशी, बोऱ्हाडेवाडी येथे पंधानमंत्री आवास योजनेत उभारण्यात येणारे गृहप्रकल्पाचे काम कोणत्या नातेवाईकाला द्यायचे याचा निर्णय होत नसल्यामुळे स्थायी समितीची सभा सलग दोनवेळा तहकूब करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यामुळे “पीसीबी”ने वृत्त दिले आणि लांडे जागे झाले, अशीच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.