“पीसीबी”चे वृत्त तंतोतंत खरे ठरले; पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायीच्या अध्यक्षपदी ममता गायकवाड

0
625

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या नगरसेविका ममता गायकवाड यांचा एकमेव अर्ज शनिवारी (दि. ३) दाखल करण्यात आला. येत्या ७ मार्च रोजी निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करून ममता गायकवाड यांचे स्थायीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होईल. दरम्यान, स्थायीच्या अध्यक्षपदासाठी भाजप नगरसेवक राहुल जाधव, विलास मडिगेरी आणि शीतल शिंदे यांच्यात खरी चुरस होती. परंतु, माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी असलेल्या नगरसेविका ममता गायकवाड स्थायीच्या अध्यक्षपदासाठी “डार्क हॉर्स ठरू शकतात, असे वृत्त “पीसीबी”ने दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले.

महापालिकेत प्रथमच सत्ता स्थापन केलेल्या भाजपचे आता दुसरे वर्ष सुरू झाले आहे. पक्षाने पहिल्या वर्षी ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांना स्थायीच्या अध्यक्षपदाचा मान दिला. त्यामुळे दुसऱ्या वर्षी या पदावर कोणाला संधी मिळणार याबाबत सत्ताधारी भाजपसोबतच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप नगरसेवक राहुल जाधव, विलास मडिगेरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक शीतल शिंदे यांच्यात अध्यक्षपदासाठी खरी चुरस होती. परंतु, माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी ममता गायकवाड या ऐनवेळी “डार्क हॉर्स” ठरतील आणि स्थायीच्या अध्यक्ष होतील, असे “पीसीबी”ने वृत्त दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे.

भाजपने राहुल जाधव, विलास मडिगेरी आणि शीतल शिंदे यांच्याऐवजी ममता गायकवाड यांना स्थायीचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्थायीच्या अध्यक्षपदासाठी ममता गायकवाड यांचा एकमेव अर्ज शनिवारी (दि. ३) दाखल करण्यात आला. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे स्थायीत पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने स्थायीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला नाही. आता अध्यक्षपदासाठी बुधवारी (दि. ७) निवडणुकीची औपचारिकता पार पाडून ममता गायकवाड यांची बिनविरोध निवड जाहीर केली जाईल.

ममता गायकवाड यांनी स्थायीच्या अध्यक्षपदाचा अर्ज नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे सादर केला. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या मावळत्या अध्यक्षा सीमा सावळे, ज्येष्ठ नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, भाजप शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, माजी नगरसेवक विनायक गायकवाड आदी उपस्थित होते.