पीपीई किट अवघ्या ६५० रुपयांत

0
262

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – रिलायन्स इंडस्ट्रीजने या समूहातील टेक्सटाइल आणि फॅब्रिक वस्त्र बनवणारी ‘आलोक इंडस्ट्रीज’ या नवीन कंपनीचे पीपीई बनवणाऱ्या कंपनीमध्ये रुपांतरण केले आहे. कोरोना व्हायरसच्या संकटकाळात संरक्षणात्मक पीपीई बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यांची किंमत चीनमधून मागवलेल्या पीपीई किटच्या तुलनेत एक तृतीयांश इतकी असेल. गुजरातमधील सिल्व्हासामध्ये आलोक इंडस्ट्रीजच्या मॅन्यूफॅक्चरिंगचे पूनर्वसन करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याठिकाणी केवळ कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाइनवर काम करणारे इतर कर्मचारी यांकरता पीपीई किट बनवण्यात येणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, दररोज एक लाखापेक्षा जास्त पीपीई किट बनवण्याची क्षमता याठिकाणी आहे. बाहेरून आयात केलेल्या पीपीई किट्सची किंमत प्रत्येकी 2000 रुपये इतकी आहे, मात्र आलोक इंडस्ट्रीजमध्ये बनवण्यात येणाऱ्या किट्सची किंमत जवळपास 650 रुपये म्हणजेच बाहेरून मागवण्यात येणाऱ्या पीपीई किट्सच्या किंमतीपेक्षा 1 तृतीयांश असणार आहे. भविष्यामध्ये या सुविधेचा वापर पीपीई किट्सची निर्यात करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.