पीडीपी फोडण्याचा प्रयत्न केला तर दहशतवादी जन्माला येतील – मेहबुबा मुफ्ती

0
344

जम्मू, दि. १३ (पीसीबी) – जम्मू काश्मीरमध्ये भाजपाच्या पाठिंब्याने सत्तेत असलेले सरकार पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासमोर पक्षाला एकजूट ठेवण्याचे आव्हान आहे. पीडीपीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात असून, मेहबुबा मुफ्तींनी अशा नेत्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. शुक्रवारी मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला चेतावणी देत आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी सलाऊद्दीन आणि यासीन मलिक या दहशतवाद्यांचाही उल्लेख केला.

मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला १९८७ ची आठवण करुन देत इशारा दिला आहे. मेहबुबा मुफ्ती बोलल्या आहेत की, ‘जर दिल्लीने १९८७ प्रमाणे लोकांच्या मतदान हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केला, लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती फार गंभीर होईल’. पुढे त्या म्हणाल्या की, ‘त्यावेळी जेव्हा एक सलाऊद्दीन आणि यासीन मलिक जन्माला आले होते, यावेळी परिस्थिती अजून चिघळेल’. दरम्यान जम्मू काश्मीरमधील भाजपा नेते रवींद्र रैना यांनी हे वक्तव्य आपत्तीजनक असल्याचे म्हटले आहे. भाजपा कोणतीही फूट पाडण्याचे किंवा पक्ष फोडण्याचे काम करत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.