Maharashtra

‘पीएमसी’ बँकेवर ‘आरबीआय’चे निर्बंध

By PCB Author

September 24, 2019

मुंबई, दि. २४ (पीसीबी) –  मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. २३ सप्टेंबर पासून हे निर्बंध लागू झाले आहेत. बँकेची सद्यस्थिती पाहून नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात नमूद केले आहे.

बँकिंग नियमन कायदा ’३५ अ’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पीएमसी बँकेवर नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तसेच निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येतील. रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत, किंवा बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नयेत, अशाप्रकारचे निर्बंध बँकेवर असतील असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे निर्बंध सहा महिन्यासाठी लागू असतील व त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल. या निर्बंधांची माहिती बँकेने प्रत्येक ठेवीदाराला देणे बंधनकारक आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलीये.

दरम्यान, आरबीआयने निर्बंध लादल्याचे समजल्यापासून पीएमसीच्या ठेवीदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व येथील पीएमसी बँकेच्या शाखेसमोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली.