पीएमपी प्रशासनाचे ढिसाळ नियोजन; दापोडी-निगडी बीआरटी बस महापालिकेसमोर बंद पडली

0
966

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावर आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी (दि. २४)  पीएमपी बस सुरू झाली. मात्र, आज (सोमवार) या मार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर बस बंद पडल्याने पीएमपी प्रशासनाचे ढिसाळ नियोजन समोर आले आहे.

आज दुपारी साडेचारच्या सुमारास पुणे स्टेशन ते निगडी बस या मार्गावरून धावत होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर बस आली असता बसचे ब्रेक सिस्टीम लॉक झाल्याने बस अडकून पडली. त्यामुळे पाठीमागून आलेल्या तीन ते चार बस थांबून राहिल्याने बसमधील प्रवाशांना तिष्ठत बसावे लागले. काही वेळाने प्रवासी वैतागून बसमधून खाली उतरून पायी निघून गेले. पीएमपी प्रशासनाच्या या भोंगळ कारभारवार प्रवाशांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान बीआरटीएस मार्गावर सुरक्षिततेबाबत उपाययोजना केल्या नसल्याचे कारण देत अ‍ॅड. हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर पालिकेने सुरक्षिततेबाबत उपाययोजना केल्या होत्या. अखेर या बीआरटीएस मार्ग सुरू करण्यास न्यायालयाने हिरवा कंदील दिला.  शुक्रवारपासून या मार्गावर बस सुरु झाली. मात्र, बस सुरू झाल्याच्या चौथ्या दिवशीच बस अडकून पडल्याने  पीएमपी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.