Banner News

पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू होणार, पिंपरी महापालिका देणार चार कोटी

By PCB Author

January 11, 2022

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपीएमएल) कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी पुणे महापालिका सहा कोटी व पिंपरी-चिंचवड महापालिका चार कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देणार आहे. यासाठी पुणे, पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनी संचालक मंडळाच्या बैठकीत सहमती दिल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक स्वारगेट येथील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयात सोमवारी (दि.10) पार पडली. अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजने अंतर्गत परिवहन महामंडळाकडील सेवकांची प्रतिपूर्तीची व हॉस्पिटल देयके तपासण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात येत असलेली मुशाहिराची रक्कम रुपये 1 हजाराऐवजी 2 हजाराप्रमाणे अदा करण्यास मान्यता देण्यात आली. पुणे महानगर परिवहन महामंडळामधील पीसीएमटी कर्मचा-यांची वैद्यकीय बिले आणि पीएमटी कर्मचा-यांची वैद्यकीय बिले स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

पीएमपीएमएल मधील ज्या कर्मचा-यांना कामावरुन कमी केले होते. अशा कर्मचा-यांनी पुन्हा सेवेमध्ये रुजू करुन घेण्यासाठी अपिल केले होते. या कर्मचा-यांचे अपिल अर्ज मंजूर करुन त्यांना पुन्हा नियमित सेवेत घेण्याच्या विषयास यावेळी मान्यता देण्यात आल्याची माहिती महापौर ढोरे यांनी दिली.