Chinchwad

पिंपळ सौदागर येथील पीडित कुटुंबियांची घेतली विजया रहाटकर, आमदार जगतापांनी भेट

By PCB Author

July 24, 2019

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – पिंपळ सौदागर येथील अडीच वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार झाल्याचा निर्दयी प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या घटनेनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

हा प्रकार निंदनीय असून आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सुचना रहाटकर यांनी पोलिसांना यावेळी दिल्या. पीडित कुटुंबाला सुरक्षा आणि मदत देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. तसेच कुटुंबाला दिलासा दिला. अशा प्रकारच्या घटना दुर्दैवी असून निषेधार्थ आहेत, असे सांगून रहाटकर यांनी या प्रकाराबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. यावेळी अपर पोलिस आयुक्त रोमनाथ पोकळे, नगरसेवक शत्रुघ्न काटे उपस्थित होते.

दरम्यान, पिंपळे सौदागर येथील लेबर कँप येथील वस्तीतून  अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर  अत्याचार करण्यात आला.  याप्रकरणी सांगवी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.  सोमवारी  मध्यरात्रीपासून ही मुलगी बेपत्ता होती.  पहाटे तीन वाजेपर्यंत या मुलीचा तिच्या आई वडिलांनी शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही,  त्यानंतर  सांगवी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी दिली होती.