पिंपळे निलख येथे महिलेच्या गळ्यातील ५० हजारांची बोरमाळ चोरट्यांनी केली लंपास

0
432

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – बहिणीसोबत भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील दिड तोळे वजनी ५० हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांनी हिसका मारुन चोरुन नेली. ही घटना गुरुवार (दि.१६) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपळे निलख विशालनगर येथील कृष्णा मेडीकलसमोर घडली.

याप्रकरणी ६५ वर्षीय वृध्द महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पल्सर मोटारसायकलवरील दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ६५ वर्षीय वृध्द महिला या त्यांच्या बहिणीसोबत गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपळे निलख विशालनगर येथील कृष्णा मेडीकलसमोरुन भाजी खरेदी करुन जात होत्या. यावेळी पल्सर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या बहिणीच्या गळ्यातील दिड तोळे वजनी ५० हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ हिसका मारुन चोरुन नेली. सांगवी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.