Chinchwad

पिंपळे निलख येथे चालत्या टेम्पोत १२ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

By PCB Author

January 04, 2019

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – पिंपळे निलख येथील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका टेम्पो चालकाने चालु टेम्पोमध्ये अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना गुरुवार (दि.३) सकाळी साडेसहा ते बाराच्या दरम्यान पिंपळे निलख बस स्टॉप ते शनिवारवाडा दरम्यान घडली.

याप्रकरणी पिडित मुलीच्या वडिलांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक शौकत अजमेर शेख (वय १९) आणि त्याचा साथीदार अमोल चंद्रकांत इंगवले (वय २१, दोघेही रा. आप्पा इंगवले चाळ, इंगवलेनगर, पिंपळे निलख) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही पुण्यात शाळेला जाते. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी टेम्पोचालक शौकत शेख यांनी पिडितेला शाळेत सोडतो म्हणून टेम्पोत बसवून नेले. यावेळी आरोपी शौकत याने पिंपळे निलख बस स्टॉप ते शनिवारवाडा रस्त्या दरम्यान चालत्या टेम्पोमध्येच मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने घरी आल्यावर घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. यावर मुलीच्या वडिलांनी शौकत आणि त्याचा साथीदार अमोल विरोधात सांगवी पोलीसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करत आहेत.