पिंपळे निलखमध्ये मेडिकल व्यावसायिकाला नवरात्रोत्सवाच्या वर्गणीसाठी जबरदस्ती; तिघांवर गुन्हा दाखल

0
760

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – नवरात्रोत्सवाच्या वर्गणीची जबरदस्ती करुन तसेच ती न दिल्यास बघून घेण्याची धमकी काही टवाळखोरांनी एका मेडिकल व्यावसायिकाला दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी (दि.६) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपळे निलखमधील विशालनगर येथे असलेल्या विजय केमिस्ट मेडिकल स्टोअर नावाच्या दुकानात घडली.

याप्रकरणी दुकान मालक नारायण विजय चौधरी (वय ३०, रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार विक्की अप्पा साठे, आकाश उर्फ सोन्या अप्पा साठे, नंग्या साठे आणि त्यांच्या काही साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नारायण चौधरी यांचे विशालनगर येथे विजय केमिस्ट मेडिकल नावाचे दुकान आहे. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी विक्की, आकाश आणि नंग्या हे तिघे त्यांच्या साथीदारांसोबत चौधरी यांच्या दुकानावर गेले. नवरात्रोत्सवाची वर्गणी देण्यावरुन आरोपी आणि दुकानातील कामगरांची भांडणे झाली. यावर आरोपींनी दुकानातील कर्मचाऱ्यांना वर्गणी न दिल्यास बघून घेण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.