Chinchwad

पिंपळे गुरव येथे सूरांच्या सुगंधात रमले रसिक  

By PCB Author

October 14, 2019

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी व नातू विराज जोशी तसेच विशेष गायक वंडर बॉय पृथ्वीराज यांची ” सुगंध सुरांचा ” ही शास्त्रीय संगीत गायन मैफल पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात रंगली.  या मैफलीला  पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील नामवंत कलावंत व रसिकांनी भरभरून दाद दिली.

यावेळी महापालिका  आयुक्त श्रावण हर्डीकर,  पंडित श्रीनिवास जोशी,  प्रविण तुपे,  पंडित हेमंत पेंडसे, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायन गुरू पंडित नंदकिशोर कपोते,  प्रख्यात कथ्थक नर्तक   आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे यांचा सत्कार  दया इंगळे,  विजय बांदिवडेकर,  स्वाती शहा,  राजकुमार सुंठवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

गायक पृथ्वीराज ने तबला- प्रज्वल दराडे,  संवादिनी- गिताराम दराडे,  तानपुरा- रोहित चौधरी यांच्या साथीने संध्याकाळी विशेषतः गायला जाणारा राग यमन, बडा ख्याल व यमन रागात मध्यलय, बडा ख्याल व दृत बंदिश,तसेच यमन रागातील सरगम, तराना आणि यमन रागातील बेदम तिहाई सादर केली.  त्यानंतर नाट्यगीत राधा धर मधुमिलिंद जय जय हे गीत सादर केले.

त्यानंतर पंडित श्रीनिवास जोशी यांनी मारवा राग गायला व देव विठ्ठल तिर्थ विठ्ठल हे सुरेल भजन सादर केले. त्यांना साथ संवादिनी- गंगाधर शिंदे, तबला- सचिन पावगी यांनी दिली. कार्यक्रमाच्या ऊत्तरार्धात गायक  विराज जोशी यांनी राग मारूबिहाग सादर केला व भैरवी ने कार्यक्रमाची सांगता केली.

निवेदन व आभार डॉ  बिना शहा यांनी मानले.