पिंपळे गुरव येथे गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह रिक्षा चालकाला अटक

0
795

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह एका रिक्षा चालकाला अटक करण्यात आली. ही कारवाई सांगवी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने बुधवारी (दि.२०) पिंपळे गुरव भैरवनाथनगर वैदवस्ती येथील जगताप पेट्रोलपंपामागे केली.

राहुल सोनकडे (वय १९, रा. जयभवानीनगर गल्ली नं.१, पिंपळे गुरव, मुळ रा. होटगी, मड्डीवस्ती, सोलापुर) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सांगवी पोलीस ठाण्याचे एक तपासी पथक सांगवी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी एका खबऱ्याने त्यांना माहिती दिली कि, पांढरा शर्ट आणि काळी जीन्सची पॅन्ट घातलेला एक तरुण गावठी कट्टा घेऊन पिंपळे गुरव भैरवनाथनगर वैदवस्ती येथील जगताप पेट्रोलपंपामागे येणार आहे. यावर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी राहुल सोनकडे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेच्या डाव्या बाजुला एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करुन राहुल याला अटक केली.

ही कारवाई सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, यशवंत साळुंके आणि पोलीस कर्मचारी भिसे, केंगले, बोऱ्हाडे, असवले, देवकांत, पिसे, नरळे, खोपकर, गुत्तीकोंडा यांच्या पथकाने केली.