चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – राष्ट्रीय अभियंतादिनाचे औचित्य साधून पिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने अभियंत्यांचे सत्कार करण्यात आले. तर सुनील नाईकनवरे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पिंपरी चिंचवड परिसरातील नितीन चीलवंत, नामदेव पवार, शाहूराज केदारे, युवराज भोसले, विजयानंद शिंदे, धैर्यशिल बुआ या अभियंत्यांचे सत्कार मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार यांचे हस्ते भारतीय संविधानाच्या पुस्तकाची प्रत व तुळशीचे रोप देऊन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना अरूण पवार म्हणाले की, महान अभियंते भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस अभियंतादिन म्हणून भारतात साजरा केला जातो. ते एक महान भारतीय अभियंते होते. त्यांनी भारतासाठी बांधकाम क्षेत्रात केलेल्या कामांना आपण एक आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे.
याप्रसंगी सुनील नाईकनवरे, शंकर तांबे, केशव बोधले, शिवदास हंडे, अलका जोशी, सुनील काकडे, गणेश ढाकने रघुनाथ घुगे भैरुजि मंडले इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश इंगो यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी केले. तर आभार नागेश जाधव यांनी मानले.