पिंपळे गुरव येथील श्री ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या नेपाळी टोळीला पोलिसांनी केले जेरबंद

0
1213

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – श्री ज्वेलर्स या सोने-चांदीचे दागिने विक्री करणाऱ्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या नेपाळी टोळीला गुन्हे शाखा, युनिट दोनच्या पथकाने हत्यारांसह अटक केली. ही कारवाई आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास नर्मदा लॉन्सच्या बाजूला असलेल्या भंगाराच्या दुकानामागील मोकळ्यात मैदानात करण्यात आली.

भिमराज गंगाराम नाथ (वय ३४, रा. साईरंग पॉप्लेक्स, काटेपुरम चौक, सांगवी, मुळ रा. नेपाळ), गिरी ठेबगे सिंग (वय ३५, रा. श्री ज्वेलर्स काटे पुरम चौक सांगवी, मुळ रा. नेपाळ), लक्ष्मण भत्ते टमाटा (वय ३२, रा. काशिनाथ हॉटेलच्या मागे कल्याण फाटा पनवेल रोड, मुंबई, मुळ रा. नेपाळ), जनक रत्न ढकाल (वय ३०, काशिनाथ हॉटेलच्या मागे कल्याण फाटा पनवेल रोड, मुंबई, मुळ रा. नेपाळ), रमेश खडक आहुजा (वय ४३, रा. तळमजला आनंद कोर्ट, रघुनाथ रोड, बांद्रा वेस्ट मुंबई, मुळ रा. नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) गुन्हे शाखा युनिट २ चे पथक विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा बसावा म्हणून पहाटेच्या सुमारास सांगवी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, नर्मदा गार्डन लॉन्सच्या बाजूला असलेल्या भंगाराच्या दुकानाचे मागे एका झाडाखाली ४ ते ५ संशयीत आरोपी हे अंधारात दबा धरुन बसले आहे. यावर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला आणि पाचही आरोपींना हत्यारे, मास्क आणि बॅटरीसह अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता ते पिंपळे गुरव येथील श्री ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकणार होते, अशी कबुली दिली. पाच ही आरोपी हे मुळ नेपाळचे आहेत. तर गिरी सिंग हा आरोपी श्री ज्वेलर्स या दुकानातच वॉचमन म्हणून कामाला होता अशी माहिती समोर आली. याप्रकरणी पाचही आरोपींविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट दोनचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे करत आहेत.