पिंपळे गुरवला ५०० कोटींची कामे सुरु, महापौरांच्या सांगवीतील विकासकामांचे काय?

0
218

– राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांचा थेट सवाल

पिंपरी,दि.२०(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर पदावर जवळ पास एक वर्ष होत आले सांगवीच्या माई ढोरे यांना संधी मिळाली व नक्कीच आम्हाला सुद्धा सर्वांना अनेक वर्षानंतर आनंदाची बातमी आली व सांगवी मध्ये या वर्षात तरी 5-6 प्रकल्प नवीन येतील असा विश्वास तयार झाला. पिंपळे गुरवमध्ये सुमारे ५०० कोटींची कामे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असताना शेजारी महापौर माई ढोरे यांच्या सांगवीतील विकासकामांचे काय, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केला आहे. प्रसिध्दीपत्रात शितोळे यांनी महापौर माई ढोरे यांना आजवर एकही मोठा प्रकल्प आणता आला नाही याबाबत खंत व्यक्त केली आहे.

पत्रकात शितोळे म्हणतात, सांगवीतील महापौर असल्याने आम्ही सांगवीकर म्हणून त्यांना सहकार्य करण्यास कधीही कमी पडणार नाही. त्याचाच एक भाग म्हणून शितोळे परिवाराने सांगवीतील महापौर पदाच्या काळामध्ये सांगवीचा मान राखला जावा महापौरांनी सुद्धा या भागात अनेक प्रकल्प केले आहेत असा त्यांचाही गौरव व्हावा यासाठी सांगवी येथील सर्वे नंबर 3 मधील संस्कृतिक केंद्राचे व क्रीडांगणाचे आरक्षण तसेच सांगवी बोपोडी पुलाला आवश्यक असणारी खाजगी जागा देण्याची तयारी दर्शविली व तसे लेखी कळविले देखील. या गोष्टीला आज जवळपास नऊ ते दहा महिने झाले आहेत तरीही यातील कोणताही प्रकल्प अद्याप मार्गी लागलेला नाही. सांगवीकर मात्र महापौर हे सर्वोच्च पद असल्याने या काळात तरी सांगवीला या व्यतिरिक्त सुद्धा अनेक विविध प्रकल्प नागरिकांच्या दिमतीला उभे राहतील, अशी अपेक्षा अजून पर्यंत तरी रेंगाळत असलेली दिसत आहे.
आता जवळपास एक वर्ष होत आले, सांगवी परिसरात काळे डांबरी रस्त्याचे पांढरे सिमेंट काँक्रिटचे रस्ते करणे व जुन्या इमारती भाजी मंडई यांना रंगरंगोटी करणे या व्यतरिक्त नव्याने दिसणारा एकही प्रकल्प झाला नाही याची खंतही वाटते असे शितोळ यांनी नमूद केले आहे.

सांगवी परिसर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळी विकसित झालेला परिसर आहे. 1987 नंतर 2019 मध्ये म्हणजे जवळपास तीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर म्हणजे नानासाहेब शितोळे महापौर झाल्यानंतर ही संधी सांगवीच्या माईना मिळालेली आहे. मात्र त्यांचाही पदाचा काळ विकासगंगा असावा अशी आमच्या अपेक्षा आयुक्त म्हणून तुम्ही तरी पूर्ण करा व त्यांच्याकडूनही करून घ्या म्हणून या निवेदनाद्वारे आपणास विनंती आहे, असे शितेळ म्हणतात.

राष्ट्रवादीच्या काळातीलच विकास कामे –
2017 पूर्वी सांगवी मध्ये शिवसृष्टी उद्यान, मधुबन येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, श्रीराम मंदिर नूतनीकरण, श्री वेताळ महाराज मंदिर नूतनीकरण शहरातील सिमेंट काँक्रीट रोड च्या कामाची सुरुवात, मॉडेल वार्डच्या माध्यमातून ममतानगर, संगमनगर, जयमालानगर, प्रियदर्शनीनगर या परिसराचा १२ ते १५ वर्षासाठी नियोजनबद्ध पद्धतीने केलेला रस्त्यांचा विकास ,पाणीपुरवठा साठी पी.डब्ल्यू.डी.मधील जागेत उद्यान, बॅडमिंटन हॉल तसेच करसंकलन कार्यालयाशेजारी व पी डब्ल्यू डी येथे पाण्याच्या उंच टाक्या, 24*7 पाणीपुरवठा योजना , सांगवीमध्ये अनेक ठिकाणी मुळा व पवना नदीकाठी पुर संरक्षण भिंत अशी व इतर अनेक कामे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात असताना व आता महापौर असणाऱ्या माई यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका व स्थायी समितीच्या अध्यक्ष असतानाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली कोणीही काय तर स्वतः माई सुध्दा नाकारू शकत नाहीत, असे शितोळे म्हणतात.

महापौर पदाच्या काळात कोरोनाच्या परिस्थितीत माई अनेक ठिकाणी गाठीभेटी देत असताना माझे कुटुंब माझी जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची योजना राबवित असताना शहरवासीयांना अजूनही गाफील राहू- नका सावध राहा असा काळजीपूर्वक संदेश देत असताना सांगवीसाठी विकासाच्या दृष्टीने गाफील राहिल्या का ? हा प्रश्न सुद्धा मनात येतो व हे सर्व शहरासाठी त्या करत असताना जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटलेला आहे. त्यामुळे व भारतीय जनता पक्षाच्या धोरणानुसार दोन महापौर करणार असल्याने व नुकताच उपमहापौर यांनी पक्ष आदेशामुळे राजीनामा दिल्याने महापौरांची सुध्दा मुदत काही दिवसानंतर संपुष्टात येईल का ? त्यामुळे त्याअगोदर सांगवीकरांना प्रत्यक्ष नाही तर किमान काही धोरणात्मक निर्णय कागदावर घेऊन हे प्रकल्प राबविणे पुढच्या काळात शक्य होऊ शकते यासाठी सांगवीकरिता संस्कृतीक भवन, क्रीडांगण,सांगवी-बोपोडी पूल, सांगवी-दापोडी पुलाशेजारील बस स्टॉप विकसित करणे, सांगवीमध्ये आधुनिक भाजी मंडई विकसित करणे,सांगवी रुग्णालय नव्याने करणे, सांगवी येथील मुळा नदीकडील 18 मीटर रस्ता व इतर रस्त्यांसाठी व कोणत्याही आरक्षणासाठी जागा देणाऱ्या जागा मालकांना नुकसान भरपाई व मोबदला देणे गरजेचे असूनही काही प्रकल्प जे त्यांनी त्यांच्या 2017 च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात नागरिकांना आश्वासने देऊन कबूल केले होते. किमान तितकी आश्वासने तरी काही प्रमाणात महापौरांनी आयुक्तांमार्फत नागरिकांना उपलब्ध करून द्यायला पाहिजेत, अशी मागणी शितोळे यांनी केली आहे.

महापौर असताना केवळ हातगाडी कारवाई , अनधिकृत बांधकामांवर कारवाई, अनधिकृत नळांवर कारवाई,रस्त्यांवर अतिक्रमण कारवाई, गल्लीबोळात ब्लॉक बसवणे, तात्पुरते शेडवर कारवाई, नियमित साफसफाई, विरोधक वाटणाऱ्या व्यक्तीवर कारवाई, महापालके मार्फत पोलिसांना सरकारी कामात अडथळा वाटत असणाऱ्या आरक्षण किंवा रस्त्यात जागा जाणाऱ्या काही नागरिकांना जागेचा मोबदला देण्याऐवजी पत्र देऊन जागा ताब्यात घेण्यासाठी एक प्रकारे भीती निर्माण करणे अशा गोष्टी तर आपोआप योग्य झाल्याच पाहिजेत यासाठी महापौरांनी आयुक्तांसह बैठका घेऊन आदेश देणे म्हणजे आयुक्तांना प्रशासनाचे धडे दिल्यासारखे आहे. पण महापौरांनी धोरणात्मक निर्णय घ्यावा व प्रकल्प सुचवा आम्ही ते प्रकल्प पूर्ण करून घेऊ असे सांगून आयुक्तांनी महापौरांना शहरात व प्रभागात विकासकामे राबविणे गरजेचे आहे . शहराच्या प्रथम नागरिक व शहराची जबाबदारी असल्याने आयुक्त व प्रशासन यांनी या भागात नवनवीन संकल्पना आणणे गरजेचे आहे, पण प्रशासन त्यांना साथ देत नाही का ? असाही प्रश्न शितोळे यांनी उपस्थित केला आहे.

सांगवीच्या शेजारील पिंपळे गुरवमध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून व इतर कामांसाठी 500 कोटींची कामे चालू आहेत पण मग सांगवीत मात्र इतके पैसे कुठे खर्च करावे हे नियोजन करण्यास कमी पडले का? सांगवीतील एका रस्त्याच्या कामासाठी भक्ती-शक्ती या पवित्र स्मारकाचे किरकोळ पैसे रक्कम वर्ग करावे लागतात हा महापौर पदाचा कमीपणा नाही का ? इतर नगरसेवकच्या प्रभागात ठीक आहे पण खुद्द महापौरांच्या प्रभागात असे पैसे सर्वसाधरण सभेमध्ये वर्ग करणे व ते सुचविणे ही चूक कोणाची? आणि संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्ती-शक्ती स्मारकाचे पैसे सांगवीकर चांगल्या मनाने स्वीकारतील का? याची माहिती आपण महापौरांना देणे आवश्यक होते असे मला वाटते, असे शितोळे म्हणतात.

माईंनी आयुक्तांवर कोणाच्यातरी सांगण्यावरून भ्रष्टाचाराचे आरोप केले असले तरीही ते मनापासुन नसावेत असे वाटते त्यामुळे आयुक्तांनी शहराच्या महापौरांच्या प्रभागात त्यांनी न सांगता जास्तीत जास्त विकासकामे केली पाहिजेत. आपण आयुक्त म्हणून बदली होऊन जाताल आम्ही मात्र याच शहरात आयुष्य काढणार आहोत व हे शहरातील सर्वोच्च पद वारंवार मिळत नाही. आम्ही जरी सध्या पक्षीय विरोधक असलो तरीही एकाच गावातील आहोत व त्यामुळेच आमच्या गावकऱ्याच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत चांगले प्रकल्प झाले पाहिजेत अशी आमची प्रमाणिक भावना, इच्छा व मागणी देखील आहे. त्यामुळे आपण भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या दोन माजी महापौरांच्या प्रभागात ज्या मोठ्या प्रमाणात विकासकामे केली त्याप्रमाणे माईंच्या प्रभागात सुद्धा विकास करावा व एक चांगली विकसित ओळख चिंचवड मतदारसंघातल्या सांगवी भागामध्ये व्हावी अशी या निमित्ताने आपणास नम्र विनंती शितोळे यांनी केली आहे.