Chinchwad

पिंपळे गुरवमध्ये बनावट सोने तारण ठेवून फायनान्स कंपनीला लाखाचा गंडा

By PCB Author

May 30, 2019

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – वनावट सोन्याच्या बांगड्या तारण ठेवून इंडिया इन्फोलाईन फायनान्स लि. या कंपनीला १ लाख ४ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ही घटना ऑक्टोबर २०१८ ते २८ मे २०१९ दरम्यान घडली.

याप्रकरणी अशोख शिवाजी माळी (वय ३८, रा. श्रीनगर, लेन नं. ३, रामकृष्ण मंगल कार्यालयजवळ पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विजय कडुबाळ गायकवाड (वय ३९, रा. फ्लॅट क्र. २०४, बी वींग शिवसाई रेसीडन्सी, पिंपळे गुरव) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय यांनी इंडिया इन्फोलाईन फायनान्स लि. या कंपनीमध्ये बनावट सोन्याच्या चार बांगड्या तारण ठेवून कर्ज घेतले होते. तसेच आरोपीने घेतलेली कर्जाची परत फेड केली नाही. यादरम्यान फायनान्स कंपनीने तारण ठेवलेल्या बांगड्यांची तपासणी केली असता त्या बनावट असल्याचे समोर आले. यावर कंपनीचे कर्मचारी अशोक माळी यांनी विजय विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विजय याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर तपास करत आहेत.