पिंपळे गुरवमध्ये दोघांना दोन देशी बनावटींच्या बंदुकांसह अटक

0
648

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे, एक देशी रिव्हॉलवर  एक जिंवत काडतुस आणि एका दुचाकी असा एकूण १ लाख २० हजार ६०० रुपये किमतीच्या ऐवजासह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खंडणी/दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी शनिवारी (दि.२०) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास नवीसांगवी चौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिंपळे गुरव येथे केली.

ओंकार किसन शिंगोरे (वय १९, रा. प्रतिक निवास बिल्डिंग शेजारी, गांगर्डेनगर, गल्ली क्र.२, काटे पुरम चौक, पिंपळे गुरव) आणि त्याचा साथीदार गणेश हनुमंत मोटे (वय २०, गल्ली क्र.३, कवडेनगर, नवी सांगवी) असे दोन बंदुका आणि तीन जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आलेल्या दोघां तरुणांची नावे आहेत. या दोघांवरही आर्म अॅक्ट कायद्या प्रमाणे सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेकडील खंडणी/दरोडा विरोधी पथकाला माहिती मिळाली होती कि, दोन इसम हे शनिवारी सायंकाळच्या सुमारास नवीसांगवी चौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंदुक विक्रीसाठी येणार आहेत. यावर खंडणी/दरोडा विरोधी पथकातील पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून ओंकार आणि गणेश या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे  एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे आणि एक देशी रिव्हॉलवर  एक जिंवत काडतुस आढळून आले. तसेच त्यांच्याकडील एका दुचाकी असा एकूण १ लाख २० हजार ६०० रुपये किमतीच्या ऐवजासह पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. पोलिस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करत आहेत.