पिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले   

0
444

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – कपडे खरेदी करण्यासाठी घरातील सर्वजण बाहेर गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरातील तब्बल १ लाख ५८ हजार रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला.  ही घटना पिंपळे गुरव येथे शुक्रवारी (दि.१४)  दुपारी चारच्या सुमारास घडली.

या प्रकरणी सुधाकर रावसाहेब पवार (वय ४८ रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी  सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर पवार पत्नीसोबत कपडे खरेदी करण्यासाठी पिंपरी बाजारात गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून  घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटात व लाकडी ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

दरम्यान, सुधाकर घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली आहे.