पिंपळेसौदागरमध्ये रंगला महाभोंडला; आयटी पार्कमधील अभियंता महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग

0
951

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – पिंपळेसौदागर येथील गणेशम फेज २ सोसायटीमध्ये नवरात्रौत्सवानिमित्त रविवारी (दि. १४) महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

सोसायटीतील सर्व वयोगटाच्या महिलांनी उत्साहाने भोंडल्याची गाणी गात फेर धरला. राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल काटे या दाम्पत्याचे हस्ते महाआरती करून भोंडल्याच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रश्नमंजुषेसह विविध पारंपारिक खेळ झाले. पिंपळेसौदागर परिसर हा आयटी हबमध्ये काम करणारे अभियंते व कर्मचाऱ्यांचा रहिवासी परिसर म्हणून ओळखला जातो. या भागातील उच्चशिक्षित महिलांनी भोंडल्यासारख्या पारंपारिक खेळात मोठ्या संख्येने सहभागी होत आपले वेगळेपण जपले.

नगरसेविका शीतल नाना काटे म्हणाल्या, “भारतीय संस्कृतीची व सणाची नव्या पिढीला ओळख व्हावी. तसेच आपले पारंपारिक सण साजरे करताना खेळल्या जाणाऱ्या पारंपारिक खेळांची माहिती व्हावी यासाठी गणेशम फेज २ या सोसायटीतील महिलांनी स्वतः पुढाकार घेत या महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आपली भारतीय संस्कृती जतन करणारे असे पारंपारिक कार्यक्रम व खेळ यापुढेही अशाच प्रकारे साजरा करण्यासाठी आपण या महिलांना नेहमी प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.”