पिंपळेसौदागरमधील सब-वेच्या कामांमुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याची नगरसेवकांची सूचना

0
745

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – पिंपळेसौदागर येथील गोविंद यशदा चौकात सुरू असलेल्या सब-वेच्या कामाची भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी महापालिकेचे अधिकारी आणि कामाच्या सल्लागारांसोबत मंगळवारी (दि. ५) पाहणी केली. या कामामुळे पादचारी आणि वाहनचालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी दोघांनीही सूचना करून त्यावर अंमलबजावणी करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले.

वाकड ते नाशिक फाटा बीआरटी रस्त्यावर गोविंद यशदा चौकात सब-वे बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत. त्याबाबत अनेक नागरिकांनी महापालिकेच्या सारथीवर तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी महापालिकेचे अधिकारी व कामाच्या सल्लागारांसोबत सब-वेच्या कामाची पाहणी केली.

सब-वेचे काम सुरू झाल्यानंतर रस्त्यावर वाहतुकीस जास्त जागा उपलब्ध व्हावी याकरिता रस्त्याच्या बाजूने असलेला फुटपाथ काढण्यात आला होता. परंतु, शेजारच्या लिनीअर गार्डनमध्ये नागरिकांना ये-जा करण्यासाठी फुटपाथ नसल्यामुळे कमालीची कसरत करावी लागत होती. याबाबत नागरिकांची तक्रारीची दखल घेत दोन्ही नगरसेवकांनी तातडीने पूर्वी असलेला फुटपाथ पुन्हा बनविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिले. तसेच नागरिकांना स्वराज गार्डन चौकातून फिरून पुन्हा गोविंद यशदा चौकात यावे लागत असल्याने नागरिकांची होणारी वेळ, इंधनाचे नुकसान वाचविण्याच्यादृष्टीने गोल्ड जिमजवळच्या बीआरटीएस बसथांब्याजवळून एक यु-टर्न वळण करण्याच्या सूचना ठेकेदाराला करण्यात आली.