Chinchwad

पिंपळेसौदागरमधील शिवम सोसायटीचा स्त्युत्य उपक्रम; ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प

By PCB Author

February 23, 2019

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – पिंपळे सौदागर येथील शिवम सोसायटीने ओल्या कचऱ्यापासून कम्पोस्ट खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचे नगरसेवक नाना काटे, नगरसेविका शीतल काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवम सोसायटीत एकूण १०४ सदनिका आहेत. या सोसायटीत दररोज एकूण एक टन ओला कचरा संकलित केला जातो.ओला व सुका कचऱ्याचे अलगीकरण करून तो सोसायटीतील प्लँटमधे संकलित करण्यात येतो. सध्या सोसायटीच्या एकाच विभागात हे काम सुरू करण्यात आले आहे. सोसायटीतील सर्व नागरीक या उपक्रमात योगदान देत आहेत. यात संकलित झालेला कचरा प्लँटपर्यंत पोचविण्यासाठी जागोजागी कचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे.

जागेवरच ओला व सुका कचऱ्याचे अलगीकरण होत असल्याने हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा मानस सोसायटी सभासदांकडुन करण्यात आला आहे. यासाठी सोसायटीच्या प्रत्येक कोपराआणि आवारात ओला व सुका कचरा संकलनासाठी डस्टबिन ठेवण्यात आले आहेत. सोसायटी परिसर व उद्यानातील पडणारा पालापाचोळा,घरातील कचरा एका ठिकाणी संकलित केला जातो. सुरूवातीला या खताचा सोसायटीतील घरातील फुलझाडे, उद्यानातील झाडांना उपयोग करण्यात येणार आहे. गरजेपेक्षा आधिक संकलित झालेल्या खताची मागणीनुसार विक्री करणार असल्याचे सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले.

उद्घाटनावेळी सोसायटीचे चेअरमन विक्रम टिकेकर, संदीप भोळे, निलेश अटल, संजय मुंदडा, मनोज हरमाळकर, ग्यान ठाकूर, जितेंद्र हंडा आदी उपस्थित होते.