Chinchwad

पिंपळेसौदागरमधील लिनिअर अर्बन गार्डनला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या; शत्रुघ्न काटे, निर्मला कुटेंची मागणी

By PCB Author

January 02, 2019

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – पिंपळेसौदागर येथील लिनिअर अर्बन गार्डनला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात नगरसेवक काटे आणि नगरसेविका कुटे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपळेसौदागरमध्ये कोकणे चौक ते स्वराज गार्डन यादरम्यान परदेशातील उद्यानांच्या धर्तीवर पावणेदोन किलोमीटर परिसरात लिनिअर अर्बन गार्डन साकारले जात आहे. पिंपळेसौदागर हा शहरातील सर्वाधिक वेगाने विकसित झालेला परिसर आहे. या भागात देशातील कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक राहतात. या भागातील प्रशस्त रस्ते व सोयी सुविधांचा शहराच्या अन्य भागातील नागरिकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. या भागात आता उभारण्यात येत असलेले लिनिअर अर्बन गार्डन पिंपळेसौदागरच नव्हे, तर पिंपरी-चिंचवड शहरातील मानाचा तुरा म्हणून ओळखले जाईल. वैविध्यपूर्ण संकल्पनांवर आधारित असलेले हे पर्यावरणपूरक उद्यान ड्रीम प्रोजेक्ट आहे. लिनिअर अर्बन गार्डन हा प्रकल्प केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या गार्डनला “छत्रपती शिवाजी महाराज लिनिअर अर्बन गार्डन” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.”