पिंपळेनिलखमधील साई कवडे या लहानग्या गिर्यारोहकाला धनंजय ढोरे, अमित पसरनीकरांकडून तीन लाखांची आर्थिक मदत

0
1516

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपळेनिलख येथील ९ वर्षांचा गिर्यारोहक साई कवडे दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो सर करण्यासाठी तयारी करत आहे. परंतु, त्यासाठी लागणारा खर्च पेलण्याची त्याच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे साई कवडे याला सांगवीतील धनंजय ढोरे आणि अमित पसरनीकर या दोघांनी तीन लाख रुपये आर्थिक मदत केली आहे. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते साईला तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. ढोरे आणि पसरनीकर यांच्या या दानशूरपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

साई कवडे हा ९ वर्षांचा मुलगा बालेवाडीतील भारती विद्यापीठाच्या शाळेत चौथीच्या वर्गात शिकत आहे. त्याला लहानपणापासून गिर्यारोहणाची आवड आहे. त्याने एवढ्या लहान वयातच महाराष्ट्रातील तब्बल ७० गडकिल्ल्यांची भ्रमंती केली आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर व सर्वात अवघड किल्ला लिंगाणा हा महाराजांच्या वेशात चढाई केली आहे. त्याने शेकडो ट्रेक केले आहेत. त्यातून आलेल्या अनुभवामुळे त्याने जम्मू-काश्मीरच्या लेह लदाख येथील अत्यंत कमी ऑक्सिजन असणारे सर्वोच्च ट्रेकेबल शिखर (१६ हजार ५०० फूट) स्टोक कांग्रीच्या बेस कँपपर्यंत यशस्वी चढाई केली आहे.

गिर्यारोहणात अशा प्रकारचे साहस करणाता साई कवडे हा भारतातील सर्वात लहान वयाचा एकमेव आहे. त्याच्या या साहसाची इंन्क्रेडिबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकात नोंद झाली आहे. आता त्याने दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर असलेले किलीमांजारो सर शिखर करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी त्याची जोरदार तयारी सुरू आहे. हे शिखर सर करण्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये खर्च येणार आहे. परंतु, कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्याच्यापुढे पेच निर्माण झाला होता. मात्र सांगवीतील धनंजय ढोरे आणि अमित पसरनीकर हे दोघे त्याच्या मदतीला धावून आल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो हे सर्वोच्च शिखर सर करण्याचा त्याच्यात उत्साह आला आहे. ढोरे आणि पसरनीकर या दोघांनीही साई कवडे याला तीन लाख रुपये आर्थिक मदत केली आहे. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते साईला तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. ढोरे आणि पसरनीकर यांच्या या दानशूरपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.