Chinchwad

पिंपळेगुरव येथे टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड; १३ वर्षीय मुलगा जखमी 

By PCB Author

December 25, 2018

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – पिंपळेगुरव येथील ओमकार कॉलनी नंबर १ येथे सोमवारी (दि.२४) रात्री एक ते दीडच्या दरम्यान, १० ते १२ जणांच्या टोळक्यांनी हातात तलवारी आणि कोयते घेऊन परिसरात उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले. यामध्ये कार, रिक्षा आणि दुचाक्यांचा समावेश आहे.  

याप्रकरणी शेखर चांदणे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तोडफोडीची घटना सुरु असताना १३ वर्षीय मुलगा अंकीत सचिन चांदणे हा  घरच्यासोबत चर्चवरून त्यांच्या कारमधून घरी परतत होता. यावेळी टोळक्यांनी त्यांच्या कारच्या काचेवर तलवारीने हल्ला केला. यामुळे कारची काच फुटली आणि अंकीतच्या डोळ्यात घुसली. यामुळे अंकितच्या डोळ्याला गंभीर इजा पोहचली.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सांगवी पोलीस तपास करत आहेत.