Chinchwad

पिंपळेगुरवमध्ये शिवाजी महाराज, महात्मा फुले, आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन

By PCB Author

May 03, 2019

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – विश्वभूषण, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव संयुक्त जयंती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यगृहात ३, ४ आणि ५ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

निळूभाऊ फुले नाट्यगृहात शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजता अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते या संयुक्त जयंती महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, पुणे बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, पुणे गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार, नृत्य कला दिग्दर्शक संतोष संखद आदी उपस्थित असतील.

उद्घाटनानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विवेक सांब्रे यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन-बुवाबाज चमत्कारामागील विज्ञान या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे यांचे लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी या विषयावर व्याख्यान होईल.

शनिवारी (दि. ४) सायंकाळी सात वाजता ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे शिवराय ते भीमराय यांच्या महाराष्ट्राच्या विचारांची दिशा या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोळकर प्रमुख पाहुणे असतील. रविवारी (दि. ५) सायंकाळी सात वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीवर आधारित ज्ञानेश महाराव यांचे संगीत संत तुकाराम हे नाटक सादर केले जाणार आहे. यावेळी माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. कुमार सपकाळ हे उपस्थित असतील.