पिंपळेगुरवमध्ये टॉपक्लास कार विकण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला सव्वा कोटींचा गंडा

0
1316

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – टॉपक्लास महागड्या कार विकण्याच्या बहाण्याने एका महागड्या कार विकणाऱ्या एजंटने व्यापाऱ्याकडून तब्बल १ कोटी १५ लाख ८३ हजार रुपये उकळले तसेच दिलेल्या महागड्या कार आरटीओची पासींग करुन देतो असे सांगून दोन्ही कार घेऊन पसार झाला. ही घटना पिंपळे गुरव येथे सप्टेंबर २०१७ ते २८ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत घडली.

विजयकुमार गोपीकुमार रामचंदानी (वय ४८, रा. आय फेस सोसायटी, पिंपळे सौदागर) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, महागड्या कार विकणारा एजंट दिलीप उर्फ विकी जगदीश शर्मा (वय ३७, रा. साई एम्बेंस, गोविंद गार्डनसमोर, पिंपळे सौदागर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप हा महागड्या आणि टॉपक्लास गाड्या विकणारा एजंट आहे. त्याने २०१७ मध्ये विजयकुमार यांना पोर्से या कंपनीची टू सीटर कार दाखवली होती. ती कार विजयकुमार यांना पसंद पडली आणि ती विकत घेण्याचे ठरवले. ६२ लाखांत सौदा ठरला. आणि कारची पासींग ही झारखंडची असल्याने कार पिंपरी-चिंचवड येथे आरटीओ नोंद करुन देण्याचे त्या किमतीतच ठरले. त्यानुसार विजयकुमार यांनी सुरुवातीला दिलीप याच्या बँक खात्यात आरटीजीएव्दारे ३४ लाख रुपये भरले. आणि दिलीपने पोर्से कार त्यांना दिली.

यादरम्यान दिलीप याने आणखी एक स्पोर्ट कंपनीची लंबोरघिनी कार विजयकुमार यांना दाखवली ती देखील त्यांना पसंत पडली आणि ती देखील घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. लंबोरघिनीचा व्यवहार ६५ लाखाता ठरला. तसेच ही कार कर्णाटक पासींग असल्याने ती पिंपरी-चिंचवड येथे आरटीओ नोंद करुन देण्याचे दिलीप याने मान्य केली. त्यानंतर दिलीपने ती कार विजयकुमार यांच्या ताब्यात दिली. विजयकुमारने दोन्ही कारची एकूण रक्कम दिलीपच्या बँक खात्यात चेक, आरटीजीस व्दारे पाठवली. काही दिवसाने दिलीप हा विजकुमार यांच्याकडे आला त्याने दोन्ही कार पासींग करुन देतो असे सांगून त्या नेल्या तो परतलाच नाही. विजयकुमार यांनी त्याला वारंवार फोन केला मात्र दिलीप याने उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांचे फोन कट केले. यावर विजयकुमार यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी आरोपी दिलीप विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.