पिंपरी विधानसभेची जागा होतेय “हॉट सीट”; सीमा सावळेंच्या संभाव्य उमेदवारीचा परिणाम

0
659

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात घडणाऱ्या राजकीय घडामोडींबाबत सातत्याने चर्चा होत असल्या तरी आगामी निवडणुकीत पिंपरी मतदारसंघ हॉट सीट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये या मतदारसंघातील उमेदवारांवर विजयासाठी फार मोठा संघर्ष करण्याची वेळ आली नाही. परंतु, आगामी निवडणुकीत स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे या प्रबळ उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. तसे झाल्यास या मतदारसंघात राजकीय टशन पाहायला मिळणार आहे. निष्क्रिय आमदार हाच या मतदारसंघातील प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

पिंपरी हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला विधानसभा मतदारसंघ आहे. शहरातील भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चा होत असतात. त्या तुलनेत पिंपरी मतदारसंघातील राजकीय घडामोडींना राजकीय वर्तुळात फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रत्येकी एकदा या मतदारसंघातून विजय मिळविला आहे. शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार हे सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे हे या मतदारसंघाचे माजी आमदार होते. या दोन्ही आजी व माजी आमदारांनी जनतेची कोणती कामे केलीत, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. त्याचे उत्तर आजतागायत सापडलेले नाही.

माजी आमदार बनसोडे असोत की विद्यमान आमदार चाबुकस्वार असोत या दोन्ही आमदारांचा त्या त्या राजकीय पक्षांनी केवळ राजकारणासाठी वापर करून घेतला असेच दिसून येते. त्यामुळे चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत पिंपरी विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या कायम मागास राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांनी प्रत्येकवेळी नवीन आमदार निवडून देण्याचा पायंडा पाडला आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत हेच मतदार काय नवीन कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शहरातील अन्य दोन विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांप्रमाणेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनीही निवडणूक मैदानात उतरण्याची चाचपणी सुरू केली आहे. त्यामध्ये अनेकांचा समावेश आहे.

शिवसेनेचे विद्यमान आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार हेदेखील आगामी निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून पुन्हा नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी तर सर्वांच्या आधी विधानसभेची तयारी चालविली आहे. बनसोडे यांनी आतापासूनच प्रमुख नागरिकांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. त्यामुळे हे दोन्ही आजी व माजी आमदार पुन्हा एकमेकांना भिडणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु, या दोघांनाही टक्कर देण्यासाठी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. तसे झाल्यास पिंपरी मतदारसंघात आगामी निवडणुकीत राजकीय टशन पाहायला मिळणार आहे.

सीमा सावळे या अभ्यासू आणि धडाडीच्या राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. महिला असूनही त्यांनी शहराच्या राजकीय वर्तुळात आपले वेगळे वलय निर्माण केलेले आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद सांभाळताना सावळे यांनी आतापर्यंतच्या सर्व माजी अध्यक्षांचे रेकॉर्ड तोडले आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याबरोबरच त्यांनी विकासकामे करण्याचा चांगला पायंडाही पाडला आहे. त्यांच्या कामाचा वेग, धडाडी आणि निर्णयक्षमता पाहून विरोधकांसोबत स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांच्याही पोटात गोळा आला होता. परिणामी सीमा सावळे यांच्या स्थायीच्या अध्यक्षपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ प्रचंड गाजला होता.

त्यामुळे सावळे या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास पिंपरी मतदारसंघ चर्चेने ढवळून निघणार आहे. या मतदारसंघाची निवडणूकही भोसरी आणि चिंचवड मतदारसंघांसारखीच गाजणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येतील, तसतसे रंगतदार चित्र पिंपरी-चिंचवडकरांना पाहायला मिळणार आहे. सीमा सावळे निवडणुकीच्या मैदानात उतरल्या, तर पिंपरी मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. या मतदारसंघाच्या निवडणुकीत आतापर्यंतचे निष्क्रिय आमदार हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरेल. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघ हॉट सीट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.