पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत महिलांना चारचाकी हलके वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते सोमवारी (दि. ९) झाले. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांच्या पाठपुराव्याने आणि पुढाकाराने हे प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय झाला होता.

यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेविका आशा धायगुडे-शेडगे, निर्मला कुटे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आदी उपस्थित होते.

या महिला वाहन प्रशिक्षणासाठी मनपास एकूण ७ हजार ८५६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील १ हजार ७४४ पात्र महिलांना पहिल्या टप्प्यात चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १ हजार ६०० पात्र महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर यांनी दिली. तसेच प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या गरजू महिलांना व्यवसाय करण्यासाठी ओला व उबेरसारखे वाहन खरेदीसाठी महापालिकेमार्फत सबसिडीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिका हद्दीतील आठवी पास महिलांना या वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी एक लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी कोणतेही सहभाग शुल्क आकारले जाणार नाही. तर एक लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांकडून केवळ २५ टक्के सहभाग शुल्क आकारले जाणार आहे. विधवा महिलांसाठी सहभाग शुल्क आकारले जाणार नाही. वयाची २२ वर्षे पूर्ण केलेल्या महिला या योजनेत सहभागी होऊ शकतात. वाहन प्रशिक्षण देणेकामी महापलिकेने दोन मोटार प्रशिक्षण संस्थांची नेमणूक केलेली आहे. योजनेतील सहभागी महिलांना वाहन परवाना मिळण्यासाठी आवश्यक वैद्यकीय दाखला त्यांच्या निवासाच्या जवळील महापालिका दवाखान्यातून देण्यात येणार आहे. तसेच मोरवाडी आयटीआयमार्फत ऑनलाईन परीक्षेचा सराव करून घेण्यात येणार आहे.