पिंपरी महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना सुरक्षेची साधने मोफत पुरविण्याची मागणी

0
493

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्यकता असून त्यांना जीवनावश्य वस्तूसह आरोग्याच्या सुविधा मोफत पुरविण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छतेची कामे करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याबाबत महापालिका प्रशासन निष्काळजीपणा करत असल्याचे दिसून येत आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही योजनांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची भिती आहे. कामगारांना हातमोजे, गमबुट, मास्क, रेनकोट, गणवेश अशा किमान सुविधाही त्यांना पुरविल्या जात नसल्याने या कामगारांना कर्करोग, त्वचारोग, टीबी, श्वसनविकाराचे प्रमाण वाढत आहे.

महापालिकेत सुमारे चार हजार पाचशे कंत्राटी सफाई कामगार आहेत. शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या या कामगारांना सुरक्षेची कोणतीही साधने न देता केवळ पगारावरच त्यांची बोलवणी केली जाते. तरी महापालिकेनी याची दखल घेवून त्यांना जीवनावश्य वस्तूसह आरोग्याच्या सुविधा मोफत पुरविण्यात याव्यात, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.