Banner News

पिंपरी महापालिकेच्या एका महिला कर्मचाऱ्याला लोकप्रतिनिधी देताहेत मानसिक त्रास; पतीचा आरोप

By PCB Author

July 20, 2018

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई प्रभाग कार्यालयात कार्यरत मीटर निरीक्षक शितल चतुर्वेदी यांची राजकीय दबावातून बदली करण्यात आली. त्यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली. त्याची प्रशासनामार्फत दखल घेतली जाण्यापूर्वी काही राजकीय मंडळींनी शितल चतुर्वेदी व माझ्यावर काही लोकप्रतिनिधींनी बिनबुडाचे आरोप करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मनमानी कारभाराला साथ देत नसल्यामुळे शितल चतुर्वेदी यांच्याविरोधात खोट्या तक्रारी करून बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्याच एका महिला कर्मचाऱ्याचा राजकीय बळी दिला जात असताना महापालिका प्रशासन चिडीचूप आहे, असा आरोप शितल चतुर्वेदी यांचे पती रोहित चतुर्वेदी यांनी केला.

रोहित चतुर्वेदी पत्रकार परिषदेत म्हणाले, “माझी पत्नी शितल चतुर्वेदी ई प्रभागात मीटर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता आय्युब खान पठाण यांनी ८ जून  रोजी चतुर्वेदी यांची भोसरीतील ई प्रभागातून थेट निगडीतील फ प्रभागात  बदली केली. पठाण यांना तृतीय क्षेणीतील कर्मचाऱ्याची बदली करण्याचे अधिकार नसतानाही त्यांनी ती केली. ही बदली चुकीच्या पध्दतीने झाल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पुराव्यासह तक्रार करण्यात आली. त्यावर प्रशासनाकडून कार्यवाही होत नाही. या चुकीच्या पद्धतीने झालेल्या बदलीची आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर राजकीय मंडळींकडून पत्नी शितल चतुर्वेदी यांना त्रास देण्याचा उद्योग सुरू झाला. माझ्या व्यावसायाचा आधार घेऊन माझ्यावर देखील आरोप केले गेले. आपल्यावर झालेल्या आरोपांना कुठलाही आधार नसून ते बिनबुडाचे आहेत.

माझा मीटर विक्रीचा व्यवयाय अधिकृतपणे आहे. पत्नी शितल चतुर्वेदी यांचे पद व त्यांच्या अधिकार कक्षेत मीटर देणे हा विषय येत नाही. कुठेही संबंध नसताना आणि पुरावे नसताना देखील केवळ पत्नीला व मला बदनाम करण्यासाठी हे खोटे आरोप केले गेले. या सगळ्यामुळे माझ्या पत्नीला मानसिक त्रास झाला आहे. राजकीय मंडळींच्या आरोपानंतर प्रशासनामार्फत माझ्या पत्नीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचा खुलासाही सादर करण्यात आला आहे. परंतु, अयुबखान पठाण यांनी अधिकार नसताना केलेल्या बदलीबाबत प्रशासन विभागाने खुलासा मागूनही अद्याप तो त्यांनी दिलेला नाही.

महापालिकेच्या एका महिला कर्मचाऱ्याला राजकीय मंडळी व महापालिका प्रशासनाकडून दुटप्पीपणाची वागणूक मिळत आहे. प्रशासन देखील महिलेच्या पाठीशी उभे न राहता राजकीय दबावाचे बळी ठरत आहे. आमच्यावर हा अन्याय होत आहे. महापालिका आयुक्तांनी यातील सत्यता पडताळून योग्य न्याय द्यावा. त्यासाठी पीएमओ पोर्टल व आपले सरकार यावर देखील तक्रार केली आहे. राजकीय व्यक्तींकडून होत असलेली नाहक बदनामी व महापालिका प्रशासनाकडून मिळणारी वागणूक यासंदर्भात न्यायालयीन मार्गाने कायदेशीर लढा द्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.”