पिंपरी महापालिका स्थायी समितीवर राष्ट्रवादीकडून प्रज्ञा खानोलकर व गीता मंचरकर यांची वर्णी

0
608

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीवर आठ सदस्य (भाजपचे सहा आणि राष्ट्रवादीचे दोन) निवृत्त झाले आहेत. या निवृत्त सदस्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांची आज (बुधवार) सर्वसाधारण सभेत निवड  करण्यात आली. राष्ट्रवादीने प्रथमच निवडून आलेल्या नगरसेविका प्रज्ञा खानोलकर व दुसऱ्यांदा निवडून आलेल्या गीता मंचरकर यांची स्थायी समितीवर निवड केली आहे.

स्थायी समितीवर १६ नगरसेवकांची निवड केली जाते. त्यातील एकाची समितीच्या अध्यक्षपदी निवड होते. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत सत्तांतर घडले. शहरातील मतदारांनी भाजपकडे सत्ता दिली. त्यानंतर मार्च २०१७ मध्ये स्थायी समिती अस्तित्वात आली. या समितीत भाजपच्या सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, उषा मुंढे, माधुरी कुलकर्णी, हर्षल ढोरे, निर्मला कुटे, कोमल मेवाणी यांची, तर राष्ट्रवादीच्या अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ या चार नगरसेवकांची आणि शिवसेनेच्या अमित गावडे व अपक्ष नगरसेवक कैलास बारणे यांची सदस्य म्हणून निवड झाली होती.

नियमानुसार या सोळांपैकी आठ नगरसेवक एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे स्थायी समितीतून निवृत्त होतात. या आठ नगरसेवकांची चिठ्ठ्या काढून निवृत्ती जाहीर केली जाते. त्यानुसार भाजपच्या सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे, कुंदन गायकवाड, हर्षल ढोरे, कोमल मेवाणी, उषा मुंढे हे सहा जण, तर राष्ट्रवादीच्या अनुराधा गोफणे आणि वैशाली काळभोर या दोन नगरसेविका स्थायी समितीतून आज (बुधवार) निवृत्त झाल्या. या निवृत्त नगरसेवकांच्या जागेवर आजच (बुधवार) सर्वसाधारण सभेत नवीन आठ नगरसेवकांची निवड  करण्यात आली. राष्ट्रवादीने प्रथमच निवडून आलेल्या नगरसेविका प्रज्ञा खानोलकर व दुसऱ्यांदा निवडून आलेल्या गीता मंचरकर यांची स्थायी समितीवर निवड केली आहे.