Banner News

पिंपरी महापालिका कर्मचारी महासंघावर प्रशासकाची नेमणूक

By PCB Author

July 21, 2019

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका  कर्मचारी महासंघाची विद्यमान कार्यकारणी बरखास्त करुन पुण्यातील  श्रमिक संघाच्या उपनिबंधकांची  प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. तसेच कर्मचारी संघटनेचा संपुर्ण ताबा  आणि सर्व आर्थिक व्यवहार ताब्यात घेऊन प्रशासकांनी पुढील तीन महिन्यांत सभासदांची यादी तयार करावी, कार्यकारिणी  निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, असा आदेशही औद्योगिक न्यायालयाने दिला आहे. 

कर्मचारी महासंघाचे खजिनदार तसेच वादी अंबर किसनराव चिंचवडे यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्या  मनमानी कारभाराविरोधात आपण ११ जून  २०१८ रोजी  कामगार आयुक्तांकडे  तक्रार दाखल केली होती. त्यावर वेळोवेळी सुनावणी झाली. आपल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यावर कामगार आयुक्तांनी १ एप्रिल  २०१९ रोजी या तक्रारींबाबत औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्याबाबत संमती पत्र दिले.

त्यानंतर ज्येष्ठ विधीज्ञ संतोष म्हस्के यांच्यामार्फत ३ मे २०१९ रोजी औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन औद्योगिक न्यायालयाने कर्मचारी महासंघावर  दैनंदिन कामकाज करण्यास मनाई करुन आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्याचा अंतरिम आदेश दिला

या दाव्याव १८ जुलैरोजी अंतिम सुनावणी झाली.  दोन्ही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून  औद्योगिक न्यायालयाचे सदस्य  एम. आर. कुंभार यांनी  कर्मचारी महासंघाची विद्यमान कार्यकारणी बरखास्त करण्याचे आदेश दिले. तसेच उपनिबंधकांची प्रशासक म्हणून नेमणूक केली. याबाबतचा चौकशी अहवाल औद्योगिक न्यायालयाकडे सादर करावा, असेही आदेशात नमूद आहे.