पिंपरी पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्याला कोरोना

0
438

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एक पोलीस अधिकारी करोनाबाधित आढळल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देहूरोड परिसरात राहणाऱ्या एका पोलिसाला करोनाची लागण झाली होती. पोलीस आयुक्तालयातच करोनाचा शिरकाव झाल्याने योग्य ती खबरदारी घेतली जात असून करोनाबाधित पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. राज्यातील कोरोनाबाधीत पोलिसांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने गृहखात्यात घबराट आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस दलात अखेर करोनाने शिरकाव केला असून दोन दिवसांपूर्वी देहूरोड येथील पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं होतं. परंतू, आज पोलीस आयुक्तालयातच कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. आज सकाळी त्या अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली. तर देहूरोड येथील पोलीस कर्मचाऱ्याचे अवघे कुटुंबच करोना पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या परंतू पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाली होती. तर वाकड परिसरात राहात असलेल्या मात्र पुण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाला देखील करोना झाला होता.