पिंपरी पुन्हा बंद कऱण्याची वेळ का आली ?

0
511

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात गल्या दोन-तीन दिवसांत रोज ४०-५० कोरोना रुग्ण आढळत असल्याने मोठी घबराट आहे. दारुची दुकाने सुरू झाल्यानंतर रुग्णांच्या संख्यत अचानक वाढ झाली. शहर रेडझोनमधून ऑरेंज झोनमध्ये आल्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठांसह बहुतांश व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, ही परवानगी मिळताच हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरू लागल्याने तसेच गेल्या चार दिवसांत प्रतिदिन वीसहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्याने पिंपरीतील मुख्य बाजारपेठ पुन्हा बंद करण्यात आली आहे.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे सर्वच्या सर्व व्यवसाय ठप्प झाला होता. लॉकडाऊन चार घोषित केल्यानंतर घेतलेल्या फेरआढाव्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळण्यात आले होते. शहरातील उद्योग, व्यवसाय काही अटी व शर्ती घालून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. गुरुवारपासून शहरातील बहुतांश दुकाने, बाजारपेठा, कंपन्या आणि लघुउद्योग खुले करण्यात आले होते. तर मुख्य बाजारपेठांमध्ये सम आणि विषय तारखेला दुकाने सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

दुकाने उघडताच दोन महिन्यांपासून घरात बसून असलेले नागरिक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर आणि बाजारपेठेत उतरल्याचे चित्र गेल्या तीन दिवसांपासून शहरात दिसत होते. पिंपरी कॅम्पमध्ये खरेदीसाठी अफाट गर्दी झाली आणि सोशल डिस्टंन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. दुचाकीवर एक एवजी दोन-तीन नागरिक तर चार चाकीत फक्त दोघांना परवानगी असताना सर्व कुटुंब असे चित्र दिसू लागले.

अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली करताना कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ठरवून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन केले जात नसल्याचे समोर आले होते. त्यातच गेल्या तीन दिवसांत शहरात तब्बल 90 च्या आसपास रुग्ण आढळून आल्याने दहशत निर्माण झाली होती. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने गर्दीचा कहर होणार हे लक्षात येताच पिंपरी कॅम्पातील पूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयाची पुढे अंमलबजावणी केली जाणार की दुकाने पुन्हा उघडली जाणार याबाबत मात्र पालिका प्रशासनाने कोणतीच सूचना जाहीर न केल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे.

चिंचवड स्टेशन, भोसरी, आकुर्डी, निगडी, पिंपळे गुरव, निलख, रहाटणी, वाकड या भागातही खरदीसाठी सर्रास लोक गर्दी करताना दिसले. झोपडपट्टीतील नागरिकही परिसरात फिरताना दिसले. केन्टेन्मेंट झोन असलेल्या परिसरातही नागरिकांचाही मुक्त संचार होता. दोन महिने पूर्ण घरात बंदिस्त असलेले लोक आता मोकळे सुटल्याने कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.पुन्हा बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे दिसते.