पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम त्वरीत चालू करा- राजू मिसाळ

0
201

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम त्वरीत सुरु करण्याबाबत त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोस पुणे पिंपरी चिंचवड असे नामकरण करणेबाबतची आग्रही मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी अचानक मेट्रोची पाहणी केली. फुगेवाडी ते पीसीएमसी दरम्यान मेट्रो प्रवास त्यांनी केला. यावेळी मिसाळ यांनी पवार यांना लेखी निवेदनातून निगडी पर्यत मेट्रोसाठीची मागणी केली.

आपल्या निवेदनात मिसाळ म्हणतात, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या महत्वकांशी प्रकल्पापैकी पिंपरी चिंचवड मेट्रो हा एक प्रकल्प आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची सत्ता असताना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने या प्रकल्पास मंजूरी दिलेली आहे. त्याच प्रमाणे राज्यात महाआघाडीचे सत्ता आली असताना राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा अजित पवार यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोसाठी भरीव आर्थिक तरतूद केलली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी ते फुगेवाडी या मेट्रोचे काम पूर्णत्वास गेले आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी प्रत्यक्ष पाहणीअंती मेट्रोच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्या सोबत खासदार वंदना चव्हाण, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादी कॉग्रेचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे , पुणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी विरोधीपक्ष नेता नाना काटे, माई काटे नगरसेविका, प्रवक्ते फजलभाई शेख व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विरोधी पक्षनेता राजू मिसाळ यांनी पिंपरी ते निगडी सेंकड फेज डी.पी.आर. तयार करुन राज्यशासनाने केंद्राकडे पाठविला आहे. त्याबाबत केंद्रसरकारकडे तो त्वरीत मान्य करुन घेण्याबाबत व पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम त्वरीत सुरु करणेविषयी मागणी केली त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोस पुणे पिंपरी चिंचवड असे नामकरण करणेबाबत आग्रही मागणी केली. याबाबत मा. पवार साहेब यांनी दोन्ही मागण्याबाबत सकारात्मकता दर्शवून वरील दोन्ही मागण्या पूर्ण करणेबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु असे आश्वासन दिले.