पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी

0
1119

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो मार्ग करण्यासाठी स्थायी समितीने मंगळवारी (दि. ११) हिरवा कंदील दाखवला आहे. या मार्गासाठी महामेट्रोने तयार केलेल्या १ हजार ४८ कोटी २२ लाखांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली. आता या अहवालाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची अंतिम मान्यता घेण्यात येणार आहे.

पिंपरी ते निगडीपर्यंत सुमारे साडेचार किलोमीटर (४.४१३) लांबीचा मेट्रो मार्ग निर्माण करण्यात येणार आहे. या मार्गात चिंचवड स्टेशन, आकुर्डी आणि निगडी हे तीन मेट्रो स्टेशन असतील. मेट्रो प्रकल्पाचा मार्ग, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर आणि भूसंपादनापोटी १ हजार ४८ कोटी २२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. समितीने या अहवालाला मंगळवारी झालेल्या सभेत मंजुरी दिली. त्यावर आता सर्वसाधारण सभेत अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

या सभेत आजी-माजी नगरसेवकांना व त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक ५ लाखांचा एक वर्षांचा आरोग्य विमा काढण्यास २८ लाख ९८ हजार रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली.