पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ

0
899

– शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह वैशाली काळभोर, विशाल वाकडकर यांचा राजीनामा

पिंपरा, दि. २५ (पीसीबी) – अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमिवर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होऊ घातले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबाबत निर्णय घेतला आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर आणि युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर या तिघांनीही आपापले राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अचानक राजिनामे देण्याचा निरोप आल्यामुळे शहर राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. महापालिकेतील भाजपाच्या भ्रष्ट कारभाराबद्दल बोटचेपी भूमिका घेतल्यानेच सर्व पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी होणार असल्याचे समजले.

महापालिकेत गेली पाच वर्षे भाजपाची सत्ता आहे. या काळात स्मार्ट सिटीसह विविध कामांत भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड झाली. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत कचखाऊ भूमिका घेतल्याच्या काही तक्रारी अजित पवार यांच्याकडे गेल्या होत्या. राष्ट्रवादीचे काही प्रमुख नगरसेवक भाजपाच्या सहयोगातून विविध कामांत ठेकेदारी करत असल्याने ते विरोधात बोलत नाहीत, असेही पवार यांच्या निदर्शनास आले. निवडणुकिसाठी भाजपाचा भ्रष्ट्राचार हाच एक मोठा मुद्दा असताना त्यावर संघटना पातळीवर ठोस काहीच होत नसल्याचाही आरोप पक्षाचया एक माजी आमदारांनी केला होता. तत्काळ फेरबदल केले नाहीत तर हातातोंडशी आलेला घास जाऊ शकतो, असेही अनुमान काढण्यात आल्याने अखेर अजित पवार यांनी संपूर्ण फेरबदलाचा निर्णय घेतला आहे, असे समजले.

महापालिका निवडणूक तोंडावर असतानाही शहरवासीयांनी राष्ट्रवादीला मतदान का करावे, याचे कारण निर्माण करण्यात शहर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अपयशी ठरले आहेत. मार्च २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्षांची सत्ता भाजपने अक्षरशः सत्ता हिसकावली. आतापर्यंतच्या सत्ताकाळात भाजपा नगरसेवकांनी शहरात आणि महापालिकेतही भ्रष्टाचाराची व अनागोंदी कारभाराचा कळस केला. अनेक प्रकरणे समोर येऊनसुद्धा याचा फायदा राष्ट्रवादीला उठविता आलेला नाही. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते त्याबाबत अपयशी ठरले.

विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती घोटाळ्याचा बोभाटा करून भाजपाने राष्ट्रवादीची सत्ता घालवली. मात्र, भाजपा सत्ताकाळात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस येऊनही राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, हा भ्रष्टाचार मतदारांपर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरले आहेत. आता पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकी पूर्वीच्या शेवटच्या टप्प्यात तरी काही काम होईल, या आशेने मुख्य, युवक आणि महिला शहराध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

गेल्या महापालिका निवडणुकीत सत्ता हातातून गेल्यावर नामदार अजित पवार यांनी शहराच्या राजकारणाकडे ठरवून दुर्लक्ष केले. शहर राष्ट्रवादीचे काही बोटावर मोजण्याइतके नेते आणि पदाधिकारी सोडले, तर प्रत्येकाला एका एका कामाचा ठेका भाजपाने दिला. अनेक संधी मिळूनही, त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड महापालिकेत आपला प्रभाव दाखवू शकली नाही. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची कार्यपद्धती, अगदी केलेले कामही नीट मांडू शकली नाही. महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर यांचीही मवाळ भूमिका कायम राहिली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध दिसलाच नाही. युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी काही अंशी प्रभावी कार्यक्रम घेतले, मात्र नात्यागोत्यात अडकल्यामुळे शहराध्यक्षांच्या पुढे जाऊन काम करणे त्यांनाही शक्य झाले नाही. त्यामुळे पक्षीय संघटन आणि पक्षासाठी कार्यक्रम यामध्येही राष्ट्रवादीचे स्थानिक नेते फारसे प्रभावी ठरले नाहीत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची शहरभेटही या मंडळींनी निष्फळ ठरविली.

भाजपाचे २२ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वारंवार एकविण्यात आले. एक अपक्ष आणि चार माजी नगरसेवकांनी राट्रवादीत प्रवेश केला, पण पुढे एकही प्रवेश होऊ शकला नाही. तीन सदस्यांचा प्रभाग भाजपासाठी फायद्याचा असल्याचा अंदाज आल्यावर पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांनीही राष्ट्रवादीत जाण्याबाबातचा निर्णय बदलला, असे सांगण्यात आले. पक्षात येऊ इच्छिणाऱ्या मंडळींना, त्यांचा योग्य सन्मान होईल आणि त्यांच्या गरजा पूर्ण होतील असा दिलासा द्यावा लागेल.