Banner News

पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांना तीन महिने मुदतवाढ

By PCB Author

August 13, 2019

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व महापालिकांच्या महापौर निवडणुकींना तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज (मंगळवार) झालेल्या बैठकीत राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापौर यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ येत्या सप्टेंबरमध्ये  संपुष्टात येणार होता. परंतु, महापौरांना ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ  देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांचा कार्यकाळ १४ सप्टेंबरला संपुष्टात येत आहे. नवीन महापौरांच्या निवडीसाठी आरक्षण सोडतीची तयारी राज्य सरकारने सुरू केली होती. राज्य नगरविकास विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पत्र पाठवत महापौरांचे आरक्षणविषयक तपशील सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापलिकेने सविस्तर अहवाल सादरही केला होता. २५ ऑगस्टपर्यंत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होणार होता. परंतु महापौरांच्या निवडणुकीला तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

पिंपरी-चिंचवडचे महापौरपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे पहिले वर्ष नितीन काळजे यांना महापौरपद देण्यात आले. तर सध्या राहुल जाधव  महापौरपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांचा कार्यकाळ १४ सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. परंतु आता त्यांना तीन महिने मुदतवाढ मिळणार असल्याने जाधव ८ डिसेंबरपर्यंत महापौर पदावर कायम राहणार आहेत.