Pimpri

पिंपरी – चिंचवड महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता

By PCB Author

March 07, 2020

पिंपरी, दि.७ (पीसीबी) – महापालिकेच्या सोळा कर संकलन केंद्रांची जमा झालेली तब्बल ९८४ कोटींची दैनंदिन रक्कम ‘येस’ बँकेत अडकली आहे.

‘येस’ बँकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील ‘येस’ बँकेवर गुरुवारी (५ मार्च) निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे आता बँकेच्या खातेदारांना महिन्याला अवघे ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेलादेखील पैसे काढता येणार नाहीत. त्याचा महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची भिती आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला दररोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. दररोज मिळणारे उत्पन्न महापालिका विविध बँकांमध्ये जमा करते. त्यातून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. हा निधी ठेवीच्या स्वरूपात ठेवला जातात. ‘येस’ बँक खासगी असल्याचे माहिती असून देखील पिंपरी-चिंचवड महापालिकेने अधिक व्याजाच्या अपेक्षेने २०१७ पासून बँकेत दैनंदिन कर संकलनाची रक्कम ठेवण्यास सुरुवात केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीदेखील त्याला मान्यता दिली. बँकेत पालिकेची सुमारे ९८४ कोटी रुपयांची रक्कम आहे. त्यावर ८.१५ टक्के व्याज मिळत होते. परंतु, सरकारने बँकेवर घातलेल्या निर्बंधामुळे पालिकेला आता मोठा झटका बसला आहे. महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर होण्याची भीती व्यक्त होत आहे.