पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे ‘काऊंट डाऊन’ सुरू; राष्ट्रवादी कॉंग्रेसचा…

0
400

पिंपरी, दि.२३ (पीसीबी) : मुंबई वगळता पिंपरी-चिंचवड महापालिकेसह पुणे व राज्यातील अन्य महापालिकांसाठी तीन सदस्यीय वॉर्ड पद्धतीने अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतल्यामुळे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे “काऊंट डाऊन’ सुरू झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा डाव खेळला आहे. गेल्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा भाजपला मोठा फायदा झाला होता. आता तीन सदस्यीयचा राष्ट्रवादीला फायदा होणार की भाजपला अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होत आहे.

त्यासाठी निवडणूक आयोगाने गत महिन्यात एक सदस्यीय वॉर्ड रचनेला सुरूवात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकाकडून मुंबई वगळता इतर ठिकाणी बहुसदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी तयारी चालविली होती. शिवसेनेची चार सदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी मागणी होती, तर राष्ट्रवादी दोन आणि कॉंग्रेस एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीसाठी आग्रही होती. त्यावर तोडगा काढत अखेर मुंबई वगळता इतर ठिकाणी तीन सदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सन 2002 साली तीन सदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणूक झाली होती. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये ही लढत झाली होती. या लढतीमध्ये शहरवासीयांनी कोणालाही बहुमत दिले नव्हते. मात्र पहिलीच निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे तीन सदस्यीय वॉर्ड पद्धतीचा राष्ट्रवादीला फायदा होईल, असा दावा स्थानिक पातळीवर केला जात आहे. सन 2012 साली दोन सदस्यीय पद्धतीद्वारे झालेल्या निवडणुकीचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीला झाला होता. तर सन 2017 साली झालेल्या चार सदस्यीय वॉर्ड पद्धतीचा सर्वाधिक फायदा भारतीय जनता पक्षाला झाला होता. यावेळी तीन सदस्यीय वॉर्ड पद्धतीद्वारे निवडणूक होणार असल्याने नेमका कोणाला फायदा होणार हे मतदानानंतरच स्पष्ट होणार असले तरी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष हे शहरात तुल्यबळ लढतीसाठी आतापासूनच कामाला लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

महापलिकेची निवडणूक तीन सदस्यीय पद्धतीने होणार असल्यामुळे प्रभाग रचनेचे महत्त्व पुन्हा एकदा वाढले आहे. तर उमेदवाराच्या जनसंपर्क आणि प्रभावासोबत पक्षाच्या एकगठ्ठा मतदानावरही निकालाची गणिते अवलंबून राहणार आहेत. झोपडपट्टीतील मतदारावरही तीन सदस्यीय वॉर्ड पद्धतीने लक्ष केंद्रित होण्याची शक्‍यता असून एकगठ्ठा मतदानासाठी वॉर्ड रचनेत झोपडपट्ट्यांची जुळवणी कशा पद्धतीने केली जाते यावरही निकालाची गणिते ठरणार आहेत.